शेतकऱ्यांची लुट थांबवा

शेतकऱ्यांची लुट थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांची लुट थांबवा

परभणी: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आडतीद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये काटा घोळ करून मोठया प्रमाणावर लुट केली जात आहे. ही होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

सीसीआय मार्फत केली जाणारी कापुस खरेदी बंद झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापुस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव कापुस विकावा लागत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाकडेही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. ज्यात म्हटले आहे, शेतकरी कापुस घेवून अडतीकडे आल्यावर त्यांचे पट्टी, माप झाल्यावर १ क्विंटल कापसामागे १ किलो कापसाची कटाई धरली जात आहे. त्याशिवाय ज्या चवाळ्यामध्ये (गोणी) शेतकरी कापुस आणतो. त्या चवाळयाचे वजन सरासरी १ किलो गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते.

यामुळे आर्थिक लुट होत आहे. त्याशिवाय तूर, हरभरा व कापुस खरेदी मध्येही एकुण वजनात ९०० ग्रॅम पर्यंतचे वजन ग्राहय धरले जात नाही. या सर्व बाबी कृषी उत्पन्न बाजार समितीला माहित असूनही कृउबा प्रशासन शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या मागे उभे असलेले दिसते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या अडत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुट त्वरीत थांबवावी व संबंधीत प्रकारणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, नारायण ढगे, बंडू पावडे व लक्ष्मण राठोड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.