पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना विशेष सेवा व आंतरीक सेवा सुरक्षा पदक बहाल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान.

1 min read

पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना विशेष सेवा व आंतरीक सेवा सुरक्षा पदक बहाल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान.

नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील, अतिदुर्गम भागात बजावली महत्वपूर्ण कामगिरी.

सिध्देश्वर गिरी/ सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील तिवठाना गावचे सुपुत्र श्री रामेश्वर चंद्रभान धोंडगे हे महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक या पदावर सध्या पुणे ग्रामीण येथे "स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत" कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सन 2014 ते 2018 या कालावधीत नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील, अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काम केले आहे.
तिथे नक्षलविरोधी अभियान राबविणे, जनतेमध्ये नक्षलविरोधी प्रपोगेंडा करणे, जनजागरण मेळावे राबवून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती देणे. त्यांच्या अडिअडचणी, समस्या जाणून घेऊन संबंधित विभागाकडे त्यांचा पाठपुरावा करून त्या समस्या सोडविणे, शासनाच्या माध्यमातून सोयीसुविधा पुरवून आदिवासी जनतेचा विश्वास जिंकून त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यत्वे काम केले. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना गडचिरोलीतील कठीण व खडतर सेवेबद्दल ‘विशेष सेवा पदक’ तर केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार कडून ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले आहे. आज 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते आज त्यांना एका विशेष कार्यक्रमात ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने’ सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सद्या कार्यरत असलेल्या LCB पुणे ग्रामीण येथे सुद्धा त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक गुन्हे उघडकीस आणून अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सोनपेठ तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.