'सव्वा रुपया असो की सव्वा कोटी' स्वाभिमान महत्त्वाचा, चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक 'सामना'ला पत्र पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

'सव्वा रुपया असो की सव्वा कोटी' स्वाभिमान महत्त्वाचा, चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊतांनी अब्रू नुकसानीच्या दाव्याची किंमत वाढवावी असा सल्ला राऊतांना दिला होता. अशातच आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत म्हणाले
संजय राऊत म्हणाले की मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे. अब्रूची आणि स्वाभिमानाची काही किंमत नसते. मग 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोका, 1000 कोटींचा किंवा 1 रुपयांचा दावा ठोका. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. त्यांच्या पैशांची आम्हाला गरज नाही. त्यांच्या पैशांवर आमचे घर चालत नाही. आम्ही सामान्य लोक आहोत. आमचे कुटुंब स्वतः कमावून पोट भरते, ते त्यांनाही माहीत आहे. प्रत्येकवेळी पैशांचा मुद्दा नसतो, त्यांना प्रत्येक ठिकाणी पैसे दिसतात. तो पेसैवाल्यांचा पक्ष आहे.

गुजरातमध्ये सापडलेल्या 21 हजार कोटींच्या ड्रग्सवरुनही संजय राऊतांनी निशाणा साधला. 21 हजार कोटींचं ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हाला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचे दुसरे कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांची किंमत सव्वा रुपयाच, संजय राऊतांचा निशाणा
पीएमसी बॅंक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटुंबाला प्राप्त झाले असा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचे याबाबतचे पत्र आज सामना वृत्तपत्रात छापून आले आहे. पण पुढच्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण यांची एवढी लायकी नाही. मी यांच्यावर सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.