..तर पर्यटन महागात पडेल !

1 min read

..तर पर्यटन महागात पडेल !

अधिका-यांचा कारवाईचा इशारा

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली:शहरापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असणारा पारोळा येथील तलाव भरला असून वाहणा-या पाण्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असणारा धबधबा वाहू लागला आहे. परंतु याठिकाणी पर्यटनासाठी नागरिकांनी गर्दी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मोजकेच नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी पावसाळ्यामध्ये पारोळा येथील तलाव भरल्यानंतर वाहणारा धबधबा हा हिंगोलीकरांचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील हा धबधबा वाहू लागल्यामुळे आपसूकच नागरिकांचा ओढा याकडे आकर्षित होत आहे. धबधबा परिसरामध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याचे समोर आल्यानंतर मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी नागरिकांना या ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही नागरिकांनी सदर ठिकाणी गर्दी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे. यामुळे नागरिक निसर्ग पर्यटनाला मुकणार असलेतरी प्रत्यक्षात मात्र संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करणे हेच लोकांच्या हिताचे ठरणार आहे.