हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमा - पडळकर

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमा - पडळकर

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेलीं मंत्रिमंडळ उपसमिती गेल्या वर्षभरापासून कागदावरच आहे. या समितीकडून ओबीसींच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेले नाही. त्यामुळे अदृश्य झालेली मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करावी, अशी खोचक टिका पडळकर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात आल्याचा आरोपह पडळकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

पडळकर यांनी लिहिलेले पत्र

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी ,भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलंय, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आलाय. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलंय.

महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. बरं या समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती. ओबीसींसाठी मोठ्या वल्गना करणारे,ओबीसींवरील प्रेम दाखवत आणाभाका घेणारे आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले महाविकास आघाडी सरकारमधील ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता.

या समितीचे अध्यक्ष आहेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब आणि सदस्य तर आणखीनच ‘दिग्गज’ ओबीसी नेते आहेत, ज्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. अशा दिग्गजांची मांदीयाळी या समितीत असताना यांनी वर्षभरात ओबीसी प्रश्नांवर नेमका कोणता अभ्यास करून अहवाल सादर केलाय, हे कळायला मार्ग नाही. म्हणूनच सामान्य ओबीसी जनतेला ही फक्त ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांची ‘मांदीयाळी’ नसून ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असे वाटायला लागले आहे. ही उपसमिती गेल्या वर्षभरापासून स्थापन झाली आणि स्थापन होताच ‘अदृश्यही’ झाली.

आता ही अदृश्य व हरवलेली उपसमिती नेमकी कुठे हरवली आहे? हीला शोधण्यासाठी आपण नव्याने एखाद्या ‘टास्क फोर्स’ची स्थापना कराल का मुख्यमंत्री महोदय? तसे जर शक्य नसेल तर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ओबीसी जनतेकडून ‘ही उपसमिती हरवली आहे’, अशी आम्ही तक्रार दाखल करू. जेणेकरून नेहमीच ‘कार्यतत्पर’ असलेली पोलिस यंत्राणा या समितीचा शोध घेईल. अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रात केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.