अखेर "त्या" चालकाचा मृतदेह सापडला

1 min read

अखेर "त्या" चालकाचा मृतदेह सापडला

मरणानंतरही मृतदेहाची प्रशासनाकडून अवहेलना

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: गोदावरी पात्राच्या पुलावरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवलेल्या तुकाराम महादु तुपसमिंदर विटा(बु.)येथील या चालकाचा मृतदेह 48 तासांनी सापडला. दि.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सततची संचारबंदी, हाताला काम नाही, मुलांचे शिक्षण यातच घर कसे चालवायचे या प्रश्नाला कंटाळून गोदावरी पात्राच्या पुलावरुन उडी घेऊन तुकाराम महादु तुपसमिंदर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर मजुराने नदीत उडी टाकल्यास वाचण्याचा प्रयत्न केला होता.मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्याने सदर मजुराचा गोदावरीतच जीव गेला होता. या घटनेची माहिती प्रशासनाला दिली होती. प्रशासनाने भेट देण्याव्यतिरिक्त कोणतीही मदत कुटुंबियाला केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सदर मजुरास शोधण्यासाठी गावातीलच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मासेमारांनी परिश्रम घेतले होते. अखेर अथक परिश्रम घेऊन सदर मृतदेह पाण्याने फुगुन १८ ऑगस्ट मंगळवार रोजी वर आला होता. दरम्यान मृत तुकाराम महादु तुपसमिंदर याच्या आत्महतेमुळे हळहळ व्यक्त होत असून. हा युवक पाथरी-सोनपेठ या मार्गावर प्रवाशी गाडीवर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवायचा मिळणाऱ्या पैशातून तो कुटुंबाचा गाडा ओढत घरप्रपंच चालवत असे. मात्र मागील पाच महिन्यापासून कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचाबंदीने हातचा रोजगार गेला. यातच मुलांचे शिक्षण आणि घर कसे चालवावे असा प्रश्न समोर उभा असतांनाच पुन्हा पुन्हा संचारबंदी होऊन उपासमार होण्याची चिन्हे समोर दिसल्याने तुकाराम याने आत्महत्या केल्याचे कळते. दरम्यान मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना प्रशासनाकडून झाल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.