लग्न करुन सहा दिवसातच नववधू फरार

पतीला दीड लाखाचा गंडा, लग्न जुळविणाऱ्या दोघी फरार

लग्न करुन सहा दिवसातच नववधू फरार

औरंगाबाद : पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या महिलांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बजाजनगरात नोटरी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सहाव्या दिवशी भावाला राखी बांधून येते, असे म्हणून माहेरी आलेली नववधू गायब झाली. लग्न जुळविणाऱ्या दोन दलाल महिलाही फरार झाल्या आहेत. या प्रकरणात तक्रारदार नवरदेवाकडून १ लाख ६५ हजार रुपये घेतले आहेत. तसेच नववधूच्या अंगावर ५० हजारांचे दागिनेही होते. संतोष उत्तम बोडखे (३२ रा.नेवासा) असे या फसगत झालेल्या नवरदेवाचे नाव आहे.

नेवासा येथील कापड विक्रेते संतोष बोडखे हे लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. पंढरपुरातील सुमन (काल्पनिक नाव) नावाची एक महिला लग्न जुळवीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोडखे व त्यांच्या कुटुंबीयांनी सुमनबाईची भेट घेऊन लग्नासाठी मुलगी पाहण्यास सांगितले. आठवडाभरापूर्वी सुमनबाईने बोडखे कुटुंबीयांशी संपर्क साधून औरंगाबादला मुलगी पाहण्यासाठी बोलावून घेतले. नातेवाईक व आईवडिलांना सोबत घेऊन २० ऑगस्टला पंढरपुरात सुमनबाईकडे बोडखे आले होते. सुमनबाईने मुलगी कांचनवाडीत असून तिथे लग्नाची बोलणी करू, असे म्हणून बोडखे कुटुंबाला तिथे नेले. तिथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर शुभांगी (२५,काल्पनिक नाव) मुलगी म्हणून बोडखे कुटुंबाशी ओळख करून दिली. मुलगी पसंत केल्यानंतर शुभांगीची आई, मध्यस्थी करणाऱ्या सुमनबाई व इतरांसोबत लग्नाची बोलणी झाली.

लग्न जुळविणाऱ्या सुमनबाई व मैत्रीण या दोघींनी शुभांगीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लग्नासाठी २ लाख रुपयांची मागणी केली. बोडखे यांनी १ लाख ७० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याच दिवशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २० ऑगस्टला मध्यस्थ सुमनबाई, शुभांगीची आई व मैत्रिणीच्या उपस्थितीत बजाजनगरात नोटरीद्वारे संतोष बोडखे व शुभांगीचे लग्न लावून देण्यात आले. त्याआधी १ लाख ६५ हजार रुपये बोडखे कुटुंबीयांनी रोख व ५ हजार रुपये फोन पे द्वारे दिले. त्यानंतर शुभांगी २० ऑगस्ट रोजी पती संतोषसोबत सासरी नेवासा येथे गेली. तिथे २४ ऑगस्टला संतोष व शुभांगी यांचा हिंदू पद्धतीने मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी बोडखे कुटुंबीयांनी सून शुभांगीला मंगळसूत्र, कर्णफुले, पायांतील चेन आदी जवळपास ४० ते ५० हजारांचे दागिने घातले होते.

सातारा ठाण्यात तक्रार
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोषने तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठले. पण ही घटना सातारा ठाण्यातील कांचनवाडीत घटल्याने पोलिसांनी त्यांना सातारा ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला पोलीसांनी दिला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.