परभणी : येत्या २१ मार्च रोजी होणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला आहे. यापूर्वीच एकूण ६ संचालक सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत. तर अन्य जागांसाठी २१ मार्च रोजी मतदान होत आहे. यासाठी दिग्गजांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.
या निवडणुकीत आमदारांसह अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आ. सुरेश वरपुडकर, मेघना बोर्डिकर, चंद्रकांत नवघरे हे तीन आमदार बँकेच्या निवडणुकीतही नशीब आजमावत आहेत. तसेच हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार सुरेश देशमुख, राजेश विटेकर, साहेबराव गोरेगावकर यांच्या लढतीही महत्वाच्या मानल्या जात आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. २१ जणांच्या संचालकांपैकी ६ जण बिनविरोध निवडून आले आहेत. अनेक वर्ष बँकेवर पक्की मांड असलेले वरपुडकर-बोर्डिकर हेही आपआपल्या परीने प्रयत्नांची शर्थ करत आहेत. या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध काढण्याचा विचार असला तरी ही गाडी अद्याप ६वरच थांबली आहे. आमदार सुरेश वरपुडकर हेही बिनविरोध निवडुन आले नाही. त्यांना प्रतिस्पर्ध्याशी सामना करावा लागणार आहे. याशिवाय राजु नवघरे, माजी खासदार शिवाजी माने यांनाही निवडणुकीला लढत द्यावी लागणार आहे. साहेबराव गोरेगावकर आणि राजेंद्र देशमुख हे सेनगाव मतदार संघातून निवडणुक लढवत आहेत. जि.प. माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनाही सोनपेठ मतदार संघातून लढत द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचे बंधू गंगाधर बोर्डीकर हेही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. आता येत्या २१ मार्च पर्यंत पडद्याआडून नक्की काय हालचाली होतात, याकडे परभणी-हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.