विजय कुलकर्णी /परभणी: कोरोना लसीकरणाच्या पुर्व अनुषंगाने लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) ला आज दि. 8 रोजी सकाळी सुरूवात झाली. मनपाच्या जायकवाडी नागरी आरोग्य केंद्रातून लसीकरणाला सुरूवात झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांची उपस्थिती होती.
भविष्यात कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येणार आहे. ही लसीकरण सत्राची पूर्व तयारी व यंत्रणेची सुसज्जता तपासून पाहण्यासाठी शुक्रवार दि. 8 रोजी रंगीत तालीम (ड्राय रनचे) जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळ पासून परभणी येथील जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, परभणीतील जांब प्राथमिक आरोग्य केंद्रावर ड्राय रनचे आयोजन करण्यात आले. यात प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थींना लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, माता व बालसर्वेक्षण अधिकारी डॉ. गणेश सिरसूलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांनी दिली आहे.