सरकारनं प्रवासाची परवानगी दिली, पण महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच.

1 min read

सरकारनं प्रवासाची परवानगी दिली, पण महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच.

लोकल ट्रेनमध्ये महिलांना परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या पत्राला रेल्वेने मान्यता दिलेली नाही.

नेहा राऊळ/मुंबई :- लोकल ट्रेनमध्ये महिलांना परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या पत्राला रेल्वेने मान्यता दिलेली नाही. राज्य सरकारनं महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र काही तासातच रेल्वेनं राज्य सरकारच्या निर्णयाला तुर्तास नकार दिला आहे.त्यामुळे सरकारनं ही भूमिका घेतली असली तरी तुर्तास पश्चिम आणि मध्य लोकल सेवा उद्यापासून महिलांसाठी सुरू होणार नाही. लगेच एका दिवशी लोकल सेवा सुरू करणं शक्य नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागानं स्पष्ट केलं की, 'लोकल सेवा सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारनं केली. पण लगेच लोकल सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे. तसंच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणं शक्य नाही, तसं पत्राद्वारे राज्य सरकारलाही कळवलं आहे.'

राज्य सरकारनं महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात पत्रक काढलं होतं. तसंच हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवण्यात आलं. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आली.पत्रात दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७ नंतर शेवटच्या लोकल पर्यंत प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती.
सकाळी मात्र लोकलमध्ये महिला प्रवास करता येणार नाही, असंही नमूद करण्यात आलं होतं. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र रेल्वेकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्यानंतर बंद असलेली मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू होऊ शकली नाही. सध्या स्थानिक प्रवास फक्त आवश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी आहे. आवश्यक सेवा कर्मचार्‍यांमध्ये पोलिस, परिचारिका, डॉक्टर, नगरपालिका सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. तथापि, मागील सहा महिन्यांपासून लोकल प्रवास लोकांसाठी बंद आहे. परिणामी, दररोज काम करणार्‍या सामान्य कर्मचार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.