मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी "कलर कोड ई" पासचा होतोय विचार.

1 min read

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी "कलर कोड ई" पासचा होतोय विचार.

गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत विचार सुरू

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे आता खालावत असल्याने ६-७ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या अनेकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याचे वेध लागले आहे. रस्त्यावरील ट्राफिक कमी करण्यासाठी आणि मुंबईचं जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आता मुंबई लोकल सुरक्षित पणे सुरू करण्याचं आव्हान सरकारी यंत्रणांसमोर आहे. नुकतीच राज्य सरकार आणि संबंधित अधिकारी मंडळींची एक बैठक झाली असून त्यावर विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. यापैकी एक म्हणजे कलर कोड ई पास. सध्या ही कलर कोड ई पास यंत्रणा कोलकता मेट्रोमध्ये गर्दी टाळण्यासाठी वापरली जात आहे.
मुंबईमध्ये कामाच्या वेळा पाहता काही विशिष्ट वेळेत तुफान गर्दी पहायला मिळते. मात्र कोरोनाशी मुकाबला करत मुंबईकरांचे जनजीवन सुरळीत करायचं असेल तर काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. दरम्यान कामाच्या वेळांमध्ये फेरविचार करण्याबाबतही विचार सुरू आहे.

काय आहे कलर कोड ई पास यंत्रणा ?

कोलकत्ता मध्ये मेट्रो पास साठी गर्दी नियंत्रणात ठेवण्यसाठी ही कलर कोड ई पास यंत्रणा राबवली जात आहे. यामध्ये रेल्वेच्या अ‍ॅप किंवा वेबसाईटवरून तुम्ही प्रवासाचं तिकीट काढू शकता. हे तिकीट प्रवासाच्या १२ तास आधी काढण्याची सोय आहे. यासाठी तुम्हांला नाव, मोबाईल नंबर, कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे त्याचं म्हणजेच ट्रेन पकडायचं स्टेशन, उतरण्याचं स्ट्रेशन, वेळ इत्यादी माहिती देणं बंधनकारक आहे. हा क्यु आर कोड मध्ये दिला जाणारा पास आहे. प्रत्येक तासाला विशिष्ट रंग असतो. या रंगांवरून ज्या वेळेचा हा पास आहे त्या वेळेतच त्याला प्रवास करण्याची मुभा आहे. रंग पाहून अधिकारी स्ट्रेशनमध्ये प्रवाशाला प्रवेश देऊ शकतो.