प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: हिंगोलीतील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या इमारतीमधून चोरट्यांनी चक्क जप्त केलेला दारू साठा लंपास केल्याची घटना (Thieves seize liquor stocks from State Excise office building in Hingoli) उघडकीस आल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने तपास करीत दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर उत्पादन शुल्क विभागाचे जुने कार्यालय असून ते जप्त केलेला माल व काही अधिकार्यांसाठी वापरले जाते. याच कार्यालयांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाईत जप्त केलेला दारू साठा ठेवण्यात आला होता. सदर दारूसाठा अज्ञात आरोपींनी दार तोडून चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तायडे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीसांत दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहर पोलीस शाखेच्या पथकाने तातडीने तपास करीत चोरीस गेलेला 18 हजार रुपयांचा दारू साठा व चोरीसाठी वापरण्यात आलेली 50 हजार रुपयांची दुचाकी जप्त करीत अनिल गाडे, पवन ठोके राहणार मस्तानशाहा नगर हिंगोली या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख शकील, सुधीर ढेंबरे, शेख मुजीब, असलम गारवे, उमेश जाधव, दिलीप बांगर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.