संभाजीराजेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या बैठकीला सुरुवात, उदयनराजेंनी मारली दांडी

1 min read

संभाजीराजेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या बैठकीला सुरुवात, उदयनराजेंनी मारली दांडी

मराठा आरक्षणांच्या बैठकीला भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले आहेत. तर, भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवी मुंबई: मराठा आरक्षणांच्या बैठकीला भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले आहेत. तर, भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी नवी मुंबईत आज ही बैठक होत आहे. संभाजीराजे या बैठकीला पोहोचताच बैठक सुरू झाली असून या बैठकीत संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाबाबत करावायच्या आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतू उदयनराजे भोसले बैठकीला नसल्यामुळे संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्रीत या आंदोलनांचे नेतृत्व करतील असे वाटत नाही.

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी दोन्ही राजे या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही राजेंनी जर एकत्र निर्णय घेतला तर तो निर्णय मराठा समाजासाठी शेवटचा असतो. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गती मिळेल असा दावा पाटील यांनी केला होता. पण आता उदयनराजेंच्या अनुपस्थितीतच बैठक पार पडणार असल्याने या काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी त्यांनी सर्व मराठा संघटनांसह खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनाही निमंत्रण दिलं होतं. हे दोन्ही नेते बैठकीला आल्याशिवाय बैठक सुरू करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या निमंत्रणावरून संभाजीराजे यांनी या बैठकीला हजेरी लावली आहे. संभाजीराजे बैठकीला येताच तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र,  उदयनराजे यांनी या बैठकीला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठा आरक्षणासाठी समाजाच्या पाठी उभं राहतानाच खासदारकीवरही पाणी सोडण्याची तयारी दाखविणारे उदयनराजे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.