भंडारा : ह्रदय पिळवटून टाकणारी घटना भंडारा येथे घडली आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटला अचानक आग लागली, या आगीत १० नवजात बालकांचा मुत्यू झाला आहे. तर सुदैवाने यात ७ बालकांना वाचवण्यात यश आले आहे.
अवघ्या काही महिन्यांच्या आणि नुकतेच जन्मलेल्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केला. यापैकी अनेक मातांनी आपल्या मुलाचा चेहराही बघितला नव्हता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा बेतला जीवावर
खर तर अतिदक्षता विभागात २४ तास परिचारीका असणे गरजेचे असते. मग घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी परिचारीका होती का ? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, आणि त्या दृष्टीने तपासही सुरु आहे.