शोध सुखाचा

मी सुखी तर जग सुखी अशी आपली धारणा एकदम उलटी आहे. जग सुखी तर मी सुखी असा विचार मनात आला की, आपण सुखी होऊ कारण जगात सुख शोधण्यासाठीचा आपला प्रवास सुरु होईल.

शोध सुखाचा

महाराष्ट्रः एका गावात एक साधूपुरुष आले. त्यांचे त्या गावात संध्याकाळी प्रवचन होते. गावात उतरताच त्यांनी एका मुलाला गावातील शाळा कोठे आहे असे विचारले, मुलगादेखील लगेच शाळेपर्यंत पोहोचवायला तयार झाला. वाटेत मुलाने विचारले, महाराज शाळेत काय काम आहे. आता तर शाळेला सुट्टी आहे. साधू म्हणाले बाळा, शाळेजवळ गुरुजींचे घर आहे ना त्यांच्याकडे जायचे आहे. आज संध्याकाळी माझे प्रवचन आहे, त्यासाठी आलोय. मुलगा म्हणाला, महाराज विषय काय आहे आपल्या प्रवचनाचा. मुलाची प्रवचनातील आस्था पाहून महाराज म्हणाले, बाळा मी गावकऱ्यांना आज सुखाचा मार्ग सांगणार आहे. मुलगा खो खो हसू लागला आणि म्हणाला, महाराज आपले प्रवचन काही खरे वाटत नाही. मुलाच्या या आगावूपणावर साधू महाराज जरा रागावत म्हणाले, का रे, तुला असे का वाटले. मुलगा म्हणाला, महाराज, अहो तुम्हाला गावच्या शाळेचा मार्ग माहीत नाही तो मला विचारलात मग सुखाचा मार्ग कसा सांगणार.


आपल्या सगळ्यांचे हे असे तर होत नाही ना, याचा विचार करायला पाहिजे, ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ असे नको व्हायला, तसे झाले तर काहीच उपयोग नाही. वारीची वाट ही आपल्याला पाषाण राहू देत नाही. खरा सुखाचा मार्ग दाखविणारी ही वाट आहे. आपल्या अंतरीतील परमेश्वराची आणि मुख्य म्हणजे तो जसा आपल्या अंतरी आहे तसा इतरांच्या अंतरीपण आहे, याची जाणीव करुन देणारी ही वारी असते. ईश्वराच्या अपरोक्ष काहीच होत नसते. आपण सुखात असो वा दु:खात तो आपल्यासोबत असतोच, अगदी कायमचा. आपणच केवळ तो आपल्या सोबत नाही अशा भ्रमात असतो.


एकदा एक माणूस समुद्रकिनाऱ्यावर वाळूतुन चालू लागला. चालताना त्याच्या डोळ्यासमोरुन त्याचा जीवनपट तरळत होता. लहानपणापासून आजपर्यंतचा सगळा इतिहास डोळ्यासमोरुन गेला. त्याने वाळूत पाहिले, सुखाचे दिवस असताना वाळूत चार पावले दिसली, त्यातली दोन देवाची होती. दु:खाच्या दिवसात मात्र केवळ दोनच पावले होती.
तो माणूस खिन्नपणे हसला आणि आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा तूही जगासारखाच निघालास ना. सुखाच्या दिवसात तू माझ्यासोबत होतास आणि दु:खात मात्र सोडून गेलास, तेवढ्यात देवच तिथे आला आणि म्हणाला, वेड्या किती अज्ञानी आहेस तू. सुखाच्या दिवसात मी तुझ्यासोबत चालत होतो म्हणून तुला वाळूवर चार पावले दिसली. दु:खाचे दिवस आल्यावर मात्र मी तुझ्यासोबत चालत नव्हतो हे खरे आहे; पण मी सोबत नव्हतो तर तुला उचलून घेऊन पुढे आलो. त्यामुळेच तर दु:खाचे दिवस पार करु शकलास आणि वाळूत तुला दोनच पावले दिसत आहेत ना ती दोन पावले तुझी नाहीत जरा नीट बघ माझी आहेत. तू तर अलगद माझ्या हातावर होतास.


वरच्या कथेतल्या माणसाप्रमाणे आपण हे विसरुन जातो की, देव आपल्यासोबत आहे. आणि आपण नाहक दु:खी होत जातो. देव जर आपल्यासोबत नेहमीकरिता असेल तर आपले वर्तनदेखील तसेच शुद्ध आणि सात्विक असायला हवे. कारण हा शुद्ध विचारच देवाला आवडतो आणि अशा विचारांच्या माणसांनाच तो सुख प्राप्त करुन देतो नव्हे, नव्हे तो त्या व्यक्तीचा अधिकार बनतो. जेव्हा आपल्या आयुष्यात काही चांगले यश देणारे घडते तेव्हा आपण त्याचे श्रेय स्वत:कडे घेतो. आणि काही वाईट घडते, संकट येते तेव्हा आपण त्याचा दोष देवाला देतो. माझ्या वाट्याला देवाने हे दु:ख का द्यावे, असा आरोप करुन आपण मोकळे झालेले असतो.
या प्रकारामुळे दु:खाचे मूळ सापडत नाही आणि ते नष्टही करता येत नाही, उलट आपल्या मनातील अहंकार आणि न्यूनगंड वाढत जातो आणि आपण अधिक दु:खी होत जातो.
मी सुखी तर जग सुखी अशी आपली धारणा एकदम उलटी आहे. जग सुखी तर मी सुखी असा विचार मनात आला की, आपण सुखी होऊ कारण जगात सुख शोधण्यासाठीचा आपला प्रवास सुरु होईल. खरंतर हे जग परमेश्वराचे आहे असे आपण मानतोना, मग त्याच्या जगातील प्रत्येक जण सुखी असावा असा आपला प्रयत्न असला पाहिजे, कारण परमेश्वरही आपलाच आहे. वारीत आपण याच सुखाचा शोध घ्यावा. ही अपेक्षा.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.