गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथील स्मशानघाटात अंत्यविधीवेळी स्मशानभूमीचे छत कोसळून २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हुन अधिक लोक गंभीर जखमी आहेत. आतापर्यंत कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्यात दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
एका फळविक्रेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाऊस आल्याने लोक छताखाली उभे राहिले होते. या छताचे बांधकाम सुरू होते. मुसळधार पावसामुळे हे छत खाली कोसळले आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक दबले गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला २ लाख रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे.