साचलेल्या पाण्याचे पूजन करून सेनेने केला मनपाचा निषेध

आता येणाऱ्या आठवड्याभरात मनपाने परिसरातील नाल्यांची साफसफाई करून रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास याच पावसाच्या साचलेल्या घाण पाण्याने मनपा आयुक्तांना आंघोळ घालू

साचलेल्या पाण्याचे पूजन करून सेनेने केला मनपाचा निषेध

परभणी : शहरातील बस स्थानकापुढील व्यापाऱ्यांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून, मनपाकडून नाल्यांचा उपसा होत नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. परिणामी, दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेनेच्या वतीने व्यापाऱ्यांसह या पाण्याचे जलपूजन करून गांधीगिरी करत 'मनपा'चा निषेध केला.

विशेष म्हणजे या संदर्भात व्यापाऱ्यांनी वेळोवेळी मनपाला निवेदने दिली आहेत. यामध्ये बसस्थानक परिसरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या भागातील नाल्यांचा उपसा होत नसल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहते. शिवाय नाल्यामधील पाणी आणि घाण देखील रस्त्यावर येत असते. ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, या ठिकाणच्या व्यापार्‍यांचा तसेच हॉटेल व्यवसायीकांचा व्यापार ठप्प झाला आहे. तसेच या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून, त्याचा परिणाम या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या डेंग्यूची साथ असून या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात साचणारे पाणी प्रचंड धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे यांच्या नेतृत्वात बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी पाण्याचे जलपूजन करून गांधीगिरी केली.

या आंदोलनात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे, शिवसेना दलित आघाडीचे तालुका संघटक सुभाष जोंधळे, विभाग प्रमुख उद्धवराव मोहिते, केदार दुधारे, अमोल हजारे, श्याम बनसोडे, प्रसाद पलटवार, निवृत्ती, बालाजी परसवाड, कमलेश मेहता, प्रकाश सोनवलकर, संतोष देशमुख, बालाजी कोकडवार, गौतम कांबळे, शंकराव परसवाड, महेश कोकड बालाजी कोकड आदींसह शिवसैनिक आणि व्यापारी सहभागी झाले होते.

अन्यथा याच पाण्याने आयुक्तांचा जलाभिषेक करू- संभानाथ काळे

मनपाला वेळोवेळी कळवून देखील बस स्थानक परिसरातील दुर्दशा कायम आहे. त्यामुळे यावेळी गांधीगिरी करण्यात आली. मात्र, आता येणाऱ्या आठवड्याभरात मनपाने परिसरातील नाल्यांची साफसफाई करून रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास याच पावसाच्या साचलेल्या घाण पाण्याने मनपा आयुक्तांना आंघोळ घालू, असा इशारा यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे यांनी दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.