मुंबई : मराठा समाजातील तरुणाने आरक्षण न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण राहाडे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असं आवाहन केले आहे. विनायक मेटेंनी मात्र हा आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी असल्याचा आरोप केला आहे.
“बीडमधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरुन निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरु असताना युवकांनी आत्महत्या करु नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.” असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसंग्राम प्रमुख विनायक मेटे यांनी ही आत्महत्या म्हणजे आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील विवेक राहाडे आत्महत्येवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी आणखी एक तरुण भावाचे आत्मबलिदान. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या आपल्या तरुण बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली.”
आत्महत्यापुर्वी लिहीली होती ही चिठ्ठी
मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल… आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तरुणाने असा उल्लेख केला आहे.

विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील केतुरा गावात विषण्ण वातावरण आहे. वातावरण बिघडू नये म्हणून केतुरा गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही विवेक राहाडे या तरुणाच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी सुरु आहेत.