चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करून अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या

६५ किलोमीटर पर्यन्त पाठलाग करीत केली अटक, औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

चोरट्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करून अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरातील गुलाबविश्व हॉल जवळील एका वाहन खरेदी विक्री दुकानावरून कारची टेस्ट ड्राइव्ह करण्याचे कारण देऊन कार पळून घेऊन जाणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ६५ किलोमीटर पाठलाग करून अवघ्या काही तासातच पूरणगाव चौफुली, मुंबई हायवे येथे ताब्यात घेतले. फैसल रफीक सैय्यद, आणि सय्यद अरबाज सय्यद आरेफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील गुलाबविश्व हॉलजवळ वैष्णवी मोटर्स हे जुन्या वाहन खरेदी-विक्रीचे दुकान आहे. तेथे बुधवारी दुपारी १२ वाजता सय्यद अरबाज सय्यद आरेफ आणि फैसल रफिक सय्यद हे दोघे आले. दालनाचे मालक पाटील यांच्याशी चर्चा करून वोक्सवॅगन कंपनीची कार (एमएच २५ डिसी ३४८८) खरेदी करण्याची तयारी दाखवली. तसेच खरेदी करण्यापूर्वी कारची एक ट्रायल घ्यायची विनंती या दोघांनी केली. त्यामुळे दुकानमालकांनी आपला २१ वर्षीय कर्मचारी रोहन संजय इंगळे याला त्यांच्या सोबत पाठविले. फैसल आणि सय्यद या दोघांनी कारची ट्रायल सुरु केली. ड्रायव्हर अरबाजच्या बाजूला कर्मचारी रोहन तर मागील बाजूस फैसल बसला, कार जालना रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपजवळ आल्यानंतर फैसलने रोहनच्या गळ्याला चाकू लावत गाडीच्या खाली उतरुन दिले. आणि गाडी वेगाने नेत फरार झाले. रोहनने लगेच याची माहिती मालकाला कळविली.

थराराला झाली सुरुवात...
अंडरवर्ल्ड डॉनला पकडण्यासाठी ज्या प्रकारे चित्रपटांमध्ये थरारक पाठलाग केलेला दाखवितात. त्याच पद्धतीनं औरंगाबाद गुन्हे शाखेनं सूत्र हलवली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सीचे वरिष्ठ निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेऊन घटनाक्रम समजून घेतला. त्यानंतर छावणी, महामार्ग पोलिस, वाळूज एमआयडीसी, दौलताबाद, वैजापूर, वाहतूक शाखा अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना अलर्ट करत रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या. आणखी एक पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे लुटारू कोणत्या दिशेने गेले याचा माग घेतला. लुटारुंची दुचाकी दुकानासमोर उभी होती. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोलिस पोहोचले. संबंधित लुटारूंची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्याचे लक्षात आले.

६५ किलोमीटर पाठलागाचा थरार...
आरोपींची ओळख पटली असली तरी त्यांचा पाठलाग करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आघाव, केंद्रे यांनी चार पथके चार दिशांना रवाना केली. सीसीटीव्ही फुटेजवरुन गाडी नगरच्या दिशेने जात असल्याचे कळाले. त्यानुसार पाठलाग सुरू झाला. पोलिसांच्या गाडीला आरोपींनी दोनदा जोरदार टक्कर दिली. पण टोलनाक्यापासून १३ किमी अंतरावर समोरून ट्रक आल्याने आरोपींना गाडी रस्त्याच्या खाली उतरवावी लागली, आणि अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात आले. हे दोन्ही आरोपी मोबाइलच्या दुकानात कामाला होते. दोन्ही आरोपींनी नारेगाव येथील फैजानचे थकलेले पैसे परत देण्यासाठी कारची चोरी केल्याची कबुली दिली. ही कार मुंबईत नेऊन विक्री करण्याचा त्यांचा डाव होता. चोरीच्या तयारीनेच हे आरोपी आले होते. या प्रकरणात रोहन संजय इंगळे (रा.पिसादेवी) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, गोकुळ ठाकुर, नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.