महाराष्ट्रातील २४ तास पाणीपुरवठा करणारी ही पहिली नगर परिषद

निलंग्यात करुन दाखविले; लातूरातही करणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर

महाराष्ट्रातील २४ तास पाणीपुरवठा करणारी ही पहिली नगर परिषद

निलंगा : पाणी टंचाईमुळे जगभरात लातूरची बदनामी झाली होती. हा बदनामीचा डाग पुसून काढण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले असून त्यात थोडेफार यशही मिळाले. मात्र याच लातूरपासून जवळ असलेल्या निलंगा शहरात आज २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी घेतलेली असून निलंग्यात करून दाखविलेले आहे. आता लातूरातही करणार असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

निलंगा शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा याकरीता १०५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आलेली होती. या योजनेचे काम पुर्णत्वास गेलेले असून या योजनेची चाचणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी आ. निलंगेकर बोलत होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना लोकहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी याकरीता प्रबळ इच्छाशक्तीची गरज असल्याचे स्पष्ट केले.या इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण निलंगा शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना मंजूर करून घेतली आणि त्या योजनेचे काम वेळेत पुर्ण करण्याचे नियोजन नगर परिषदेच्या पदाधिकार-यांनी व अधिका-यांने केल्याने आज या योजनेची चाचणी घेण्यात आलेली आहे. निलंगा ही क वर्गाची नगरपालिका असूनही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावरच २४ तास पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली असून अशा प्रकारची योजना सुरु करणारी निलंगा नगरपालिका महाराष्ट्रातील पहिलीच असल्याची माहितीही आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. जनतेला वास्तविकता पटवून दिल्यानंतर निश्चितच जनता कामासाठी साथ देते आणि निलंग्यातील जनतेने सुद्धा २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करने आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार असून याकरीता प्रत्येक नळाला मिटरही बसविण्यात येत असल्याचे सांगून आ. निलंगेकरांनी नळाला मिटर बसविण्यासाठी निलंग्यातील जनतेने विरोध न करता सहकार्य केले असल्याचे स्पष्ट केले. या सहकार्यामुळेच आज शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार असून आगामी ५० वर्षाचे नियोजन करून ही पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आणि त्याचे काम पुर्णही करून घेतले आहे. या योजनेमुळे शहरवासियांना २४ तास पाणीपुवठा होणार असला तरी पाण्याची बचत करावी असे आवाहन आ. निलंगेकरांनी यावेळी केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक घराने लवकरात लवकर नळ जोडणी करून घ्यावी जेेणेकरून आगामी काळात शहरातील अंतर्गत रस्त्याचे कामही सुरु करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगून निलंगा वासियांनी याकरीता सहकार्य करावे असे आवाहन केले.

वास्तविक लातूर म्हटले की पाणीटंचाई हे समीकरण जुळलेले असले तरी लातूरपासूनच कांही अंतरावर असलेल्या निलंगा शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे काम करून दाखविलेले असून लवकरच लातूरातही करणार असा विश्वास देऊन आ. निलंगेकर यांनी याकरीता लातूरच्या जनतेने आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळेच निलंगा शहरास २४ तास पाणीपुवठा योजना सुरु करता आलेली असून ज्या माकणी धरणातून निलंगा शहराला पाणीपुरवठा होतो ते धरण आणि त्यासाठी आवश्यक असणारी योजना माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे शक्य झालेले होते. आता याच धरणातून आगामी ५० वर्षाचा विचार करून शहराला २४ तास पाणीपुरवठा आ. निलंगेकर यांच्यामुळे होत असल्याचे सांगून स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहराच्या विकासाची जी मुहुर्तमेढ रोवली होती त्यावर कळस चढविण्याचे काम आ. संभाजी पाटील निलंगेकर करीत आहेत. त्यासाठी आ. निलंगेकरांचे निलंगावासियांच्या वतीने आपण आभार व्यक्त करत असल्याचे नगराध्यक्ष शिंगाडे यांनी सांगितले.

शहरातील पांचाळ कॉलनीत असलेल्या बहुतांश घरामध्ये २४ तास पाणीपुरवठ्याची चाचणी यावेळी घेण्यात आली. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, माजी सभापती शरद पेठकर, चेअरमन दगडू साळूंके, नगरसेवक शंकर भुरके, पं.स.चे माजी सभापती अजित माने, शेषेराव ममाळे, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, जीवन प्राधिकरणाचे खरोसेकर, आर.एस. पाटील यांच्यासह नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.