नितीश कुमार यांच्या  प्रचारसभेत कांदा फेक

1 min read

नितीश कुमार यांच्या प्रचारसभेत कांदा फेक

“फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या

पाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. नितीश कुमार आज (3 नोव्हेंबर) बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रचारसभेत लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

“बिहारमध्ये बिंधास्तपणे मद्यविक्री होत आहे. तस्करी केली जात आहे. पण तुम्ही काहीच करु शकत नाही”, अशाप्रकारची घोषणाबाजी नितीश कुमार यांच्यावर कांदा फेकणाऱ्या व्यक्तीने केली. यावेळी नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या”, असं नितीश कुमार म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु ठेवले.

नितीश कुमार यांच्यासोबत अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. त्यांना याआधीदेखील प्रचारादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला आहे. काही लोकांनी अनेकदा भर सभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. काही ठिकाणी तर नितीश यांना काळे झेंड दाखवण्यात आले आहेत.