टॉयलेट एक प्रेम कथा

1 min read

टॉयलेट एक प्रेम कथा

(डिस्क्लेमर:  या कथेतील पात्र खरी की खोटी अशी प्रश्न विचारू नयेत. शोध घेण्याचा प्रयत्न
देखील करू नये. कथेतील पात्र खोटीच समजायची असतात. नाम व स्थळ साधर्म्य आढळलं तर
तो निव्वळ योग असेल. उगाच संबंध जोडणे हा आपल्या बुद्धीचा दोष असेल.)
तर मंडळी ही देखील एक प्रेम कथा आहे. ती टॉयलेट साठी घडलेली नाही तर टॉयलेटच्या
आधाराने आकाराला आलेली ही कथा.
मंडळी, माझं गाव भिंगरी. नावाप्रमाणे गोल फिरणार नाही तर गोल फिरवणारं माझं गाव. पू. ल.
देशपांडे यांच्या कथेतील पात्र जेवढी रंजक तेवढीच माझ्या गावातील लोक रंजक. पायताण
कपड्यात बांधून त्याला पाठीवर टाकणारा आणि त्याच्यावर हात ठेवून या भाकरीच्यान म्हणणारा
बिलिंदर आणि कलंदर माणूस माझ्याच गावात तुम्हाला सापडेल.
गावात माणसं बक्कळ. सगळ्यावर लिहायचं ठरलं तर जागा पुरणार नाही. भिंगरीत बातम्या खूप
मिळतात. भिंगरी पिऊन गोंधळ घालणारी जशी मंडळी आहेत तशी भिंगरीच्या नादाने बातम्या
निर्माण करणारी मंडळी देखील आहेत. आता खबरी आहेत म्हटल्यावर खबरी सांगणारा खबरीलाल
हवाच त्यामुळे गावात अशा खबरीलालची संख्या देखील मोठी. आम्ही देखील याच खबरीलाल पैकी
एक. कोणी वास्तवचित्र मांडायचा प्रयत्न केला. तर राजांप्रमाणे सत्तेच्या मेघडंबरीत बसण्याचा
प्रयत्न केला. कोणी राजाच मन जपलं तर कोणी समता प्रस्थापित होईल असे बघत सर्वच
राजकीय पक्षांना समतेच्या दृष्टीने बघितले.
आपल्या कथेचा नायक याच खबरी लोकांपैकी एक आहे. कांतराव नाव त्याचं. दोस्त मंडळी प्रेमाने
कांत्या म्हणतात तर जवळची मंडळी 'कांतू' आपण आपलं जवळच्या मंडळी प्रमाणे कांतू म्हणू.
तर कांतू खबरी असल्याने त्याचा सर्वत्र संचार होता. गावातील गट, पक्ष राजकारण असली कोणती
बंधन कांतूला नव्हती. 'जो देता ओ नेता' हे कांतूच  साधं सरळ सूत्र आहे. आता जो नही देता
त्याला कांतू काय म्हणायचा हे इथे सांगण्यासारख नाही. 
कांतूचा वावर चार चौघात चांगला होता. चिरतरुण माणूस कांतू म्हणजे. एकाचघरातील दोन
पिढ्यात मैत्री ठेवण्याचं कसब त्याच्याकडे. बाप आणि लेक यांचा'हम निवाला हम प्याला' बनून
सोबत देण्याचं कसब कांतूला अवगत आहे. आणि हो यात कांतूचा एक रुपयाही खिशातून जात
नाही बरका.
कांतूची लोकप्रियता देखील दांडगी. गणपती मंडळ स्थापन करून विविध कलागुण भव्यतेने सादर
करायला लावणारा कांतूच, तर भिंगरी विकास मंडळ स्थापन करून अनेकांचे डोळे दिपविणारे
कार्यक्रम घेणारा देखील कांतूच.

सोलापूर लुटून पंढरपूर जेऊ घालण्याचं कौशल्य त्याला आत्मसात होते. अख्यापंचक्रोशी मधील
पुढऱ्याची स्पॉन्सरशीप घेऊन कांतू गावात मोठे मोठे कार्यक्रम घ्यायचा. यामुळे कांतूच गावातील
वजन वाढलं होतं. तर मंडळी कांतूच हे गावातील वाढलेलं वजन आपल्या कथेचं कारण आहे.
चला कथेची नायिका कोण ते सांगतो. ही नायिका कांतूच्या गल्लीमधली नाही, शाळेमधली नाही,
आणि कॉलेजला जायचा तर संबंधच येत नाही. कांतूने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात
देखील तिचा सहभाग नसायचा बरं.
सखाराम हा गावातील भोळा शेतकरी. शेतात राबावं आणि जगावं हेच सखारामच जीवन त्याच्या
भोळ्या स्वभावाने घराच्या कारभाराचा ताबा कारभारणीकडे गेलेला. पोटी अर्धा डझनला एक कमी
अशी पाच अपत्य त्यात तीन पोरी. लग्नाची चिंता, त्यासाठी पैशाची जुळवाजुळव, लेकरांचं शिक्षण
सगळं सखाराम आणि त्याची कारभारीन यांच्यासाठी चिंतेचा विषय होता. 
तर या पाच लेकरांपैकी एक शेंडेफळ म्हणजे अंजी तीच खर नाव अंजना पण खूप कमी लोकांना
ते माहीत होते. सगळे अंजी नावानेच ओळखायचे.
कांतूच लग्न झालं तेंव्हा अंजी कांतूकाकाच्या लग्नाला बारीक लेकरू म्हणून हजर होती. 
हे कसं पिक्चर मधल्या लोकसारखं होतं. आता करीना कपूरने सैफकाकासोबत लग्न केलंच की!
मंडळी पिक्चरवाल्यांचं आता घडलंय. कांतू काका विषयी अंजी च्या मनात प्रेमभाव वीसवर्षांपूर्वी
जागे झालेले आहेत. आहे की नाही आमचं भिंगरी ‘जमाने के आगे’
असो मी काय गावाबद्दल सांगत बसलोय. कांतू काकाच्या प्रसिध्दीसोबत अंजीच वय देखील वाढू
लागलं आणि कांतूला तिच्या मनातील कांत झाला.
आमचं गाव बिलंदर खबरा लगेच पोहचायला वेळ लागत नसे त्यामुळे मनातील भाव मनात राहत
होते. अंजी कांतूला आपल्या मनातील भाव सांगण्यासाठी उत्सुक होती. पण मेळ लागत नव्हता.
घरात प्रेमाचं वातावरण होतच मोठी बहीण माया चोरी चोरी चुपके चुपके प्रेमातहोतीच. तर
अप्पाच्या दुकानात असलेल्या एका मुनीमाच्या प्रेमात पडल्याने मधली बहीण हिना किराणा
भरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत होती. किराणा आणायला बहिणी सोबत दुकानात
गेल्यावर मुनीमाचा ढळता तराजू आणिहिणाच्या हाताला त्याचा लागणारा हात आणि त्यानंतर
हिणाच्या डोळ्यात आलेलेगुलाबी भाव अंजी बघायची आणि तिच्या डोळ्यात कांतू दिसायचा.
तर ही प्रेम कथा घरच्या प्रेरणेने अव्यक्त आणि अबोल स्वरूपात विकसित होत होती.
प्रश्न होता तो कोंडी कशी फोडायची याचा
अंजीच्या वाटेवर मग कांतूच घर रोज येऊ लागलं. कधी  स्लीपरचा बंद तुटलाम्हणून तर कधी
उगाच थकवा आला म्हणून अंजी कांतूच्या घरासमोर थांबू लागली. सकाळच्या वेळी साखर आणि
पत्तीची पुडी (चहा पत्ती) आणायला तिनं सुरवात केली आणि दुकान व वाट दोन्ही बदलले. 
अंजी वेडी झाली होती कांतू साठी
उडत्या पाखरांची पंख मोजणारा कांतू हे सगळं बघत होता

त्याला कोवळ्या अंजीची अस्वस्थ हालचाल लक्षात येऊ लागली होती. आणि एक दिवस कांतू
दाराबाहेर येऊन हसला. 
कांतू हसला आणि आन अंजीचा कलिजा खलास झाला.
एकेदिवशी धाडस करत दुपारच्या टायमाला अंजीन हिम्मत केली आन 'आयलब्यु'लिहिलेली चिट्ठी
कांतूच्या समोर फेकली अन धडधडत्या काळजान सुम्म पळाली. 
कांतून गल्लीत न कळता चिट्ठी उचलली अन त्याला अंजीची भावना पोहचली.
आता पैगाम पोहचला होता. पण भेटीची आस होती.
कुठं भेटायचं गाव चालू होतं. अंजी जवाणीत जात असल्यानं अंजीवर फिदा असणारे खूप होते ते
तिच्यावर वॉच ठेऊन असायचे.
आयलब्यु ची चिठ्ठी लिहून लिहून अंजी कंटाळली होती, अन वाचून कांतू. आता भेट हवी होती.
तु मला भेट असं सांगून झालं पण भेटीचा मुहूर्त काय गावत नव्हता.
माया आणि हिनाचं प्रेम भरात येत होतं. अन अंजीच्या कोवळ्या प्रेमाला अजूनअंकुर फुटत नव्हते.
हिनाच्या अप्पाच्या दुकानावरील चकरा वाढू लागल्या होत्या हिनी कॉलेजला जात होती जाता येता
त्याची भेट व्हायची. मायाचं रानात भेटून भागत होतं. पण अंजीची गाडी अजून आयलब्यूच्या
चिट्ठीवर अडकली होती.
आंखो ही आंखो मे होणा-या गुजगोष्टी तिला प्रत्यक्षात भेटून करायच्या होत्या. आणि कांतुच्या
मनात सुध्दा लड्डू फुटत होतेच. पिक्चरच्या गाण्याची भारी हौस अंजीला होती. हे कांतूला माहित
होतं. प्रेमाची भेट म्हणून गाण्याची कॅसेट द्यायचे कांतून ठरवलं आणि रत्नपूरला जाऊन दोन
भन्नाट कॅसेट सुध्दा आणल्या होत्या. त्या काळात सीडी आल्या नव्हत्या रीलवाल्या कॅसेट आणि
टेप चांगलेच वाजायचे त्या वेळेला.
कांतून कॅसेट आणल्या ख-या पण द्यायच्या कशा हा प्रश्न मोठा होता. रस्त्यानी चालताना चिठ्टी
तर घेता येत होती कॅसेट कशा द्यायच्या रोज खिडकीतून बसून कांतू अंजीला कॅसेट दाखवायचा
आणि अंजी त्या कॅसेट बघून हरखून जायची.
आयडीयाची कल्पना काय गावत नव्हती. एकादिवशी सकाळी लवकरच उठून कांतू गावाबाहेर लोटा
घेऊन निघाला. डोक्यात अंजीला कसं भेटायचं? हाच विचार होता. बालाजीच्या मंदीराच्या मागे गेला
आणि नदीच्या जवळ आल्यावर गडीमाणसं मोकळं होतात तिकडं वळू लागला. तेवढ्यात कांतूला
कोणीतरी येताना अंधूक प्रकाशात दिसलं अंधारात निट दिसत नव्हतं पण कांतूची बत्ती पेटली.
होय, तिच होती. हातात डब्बा घेऊन ती पण निघाली होती.  आणि मग कांतूच्या डोक्यात बत्ती
पेटली. अंजीन जरा जवळ आल्यावर कांतूला ओळखल. आणि तिचा चेहरा देखील खुलला.
अंजीच्या सोबत अजून एकजण होती. म्हणून तिला बोलता आलं नाही. तंबाखू मळण्याचं निमित्त

करत कांतू जरा थांबला आणि त्यांन ईशा-यानेच अंजीला सांगितलं उद्या जरा लवकर ये. ईथच
ईथून पलीकडं नदीत जाऊ.
बस आता अंजीच्या मनात कोणताच विचार नव्हता. एकच ध्यास होता. उद्या कांतूला भेटायचं,
बोलायचं, आणि आणि... अंजी लाजली चक्क लाजली. मनातल्या मनात हासू लागली.
दिवस कसा बसा गेला. रात्र मात्र खायला उठली होती अंजीच्या डोळ्याला डोळा नव्हता. ईकडं कांतू
देखील अंजीला भेटण्याची आयडीया मिळाल्याने खुश होता. दोघांची रात्र तळमळत गेली.  आणि
पहाट व्हायच्या आधीच अंजी उठली पोट दुखत असल्याचे आईला सांगत डब्बा घेऊन तडक बाहेर
पडली. गाव सुनसान होतं अजून कोणी उठलच नव्हतं. पांदीचा रस्ता सुध्दा अजून वाहता झाला
नव्हता. बालाजी मंदीराच्या समोरच्या गल्लीतून कोणीतरी येताना दिसलं अंजीची धडधड वाढू
लागली. कांतूच असलं का अजून दूसरं कोणी.  दुसरं कोणी असल तर रिकामी पंचायत होऊन
जाईल असा विचार तिच्या मनात येऊ लागला.
ती आकृती जवळ येऊ लागताच तिनं आपला वेग वाढवला आणि नदीकडं निघाली. मागून
खाकरल्याचा आवाज झाला आणि खात्री पटली. अंजी पुढं पुढं आणि कांतू मागं मागं चालू लागला.
फर्लांगभर गेल्यावर अंजी मागं राहिली आणि कांतू सुरक्षीत जाऊ लागला. बँटरी सोबत आणली
होती. पांदीची वाट सोडून जरा स्वच्छ जागी जाऊन कांतू थांबला. आणि अंजीनं धावत जाऊन
कांतूला मिठी मारली.
कांतू आणि अंजी आज तृप्त झाले होते. घट्ट मिठी मारताना हेलकावलेल डब्यातील पाणी आता
शांत झालं होतं. अंजीच्या भावना आज पांदीला मोकळ्या झाल्या होत्या. कांतून आठवनीनं लुंगीत
लपवून दोन कॅसेट आणल्या होत्या त्या कॅसेट त्यानं अंजीला दिल्या अंजीन मोठ्या खुबीनं त्या
लपवल्या. काळजातून दिलेली भेट होती ती ‘काळजाजवळ’ लपवून ठेवल्या. आता 'साथ जिने
मरनेकी कसम' खाल्ली असली तरी साथ साथ 'करता' येत  नसल्याने अनिच्छेनेच अंजी लांब गेली.
पण रोज असच जवळ यायचं वचन घेऊन. अंजी आता तिच गाणी ऐकत होती.
आता रोज दोघांची सकाळ लवकर होऊ लागली. रोज दोघं नदीच्या काठावर भेटू लागली. बसायला
जरा सोपं जावं म्हणून कांतू घरातल्या बारदान्यातून एखादं पोतं उचलून आणु लागला. आणि
कांतूचा बाप बारदाना कमी का व्हायला म्हणून चिंता करू लागला. अंजी आणि कांतूची प्रेम कथा
बहरात आली होती. रोज भेट होत होती. 
पण भिंतीला कान असतात म्हणतात. ही दोघं तर खुले आसमान के निचे भेटत होती. पाखरं
राखायला जाणारी, जागलीवरून परत निघालेली, रानात दुधाला निघालेली माणसं नदीतल्या

हालचाली टिपत होती. अंदाज घेत होती. कोणी खाकरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत
होती. तर कोणी ‘उठा रं’ असं म्हणून निघून जात होती. गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू
झाली. आणि त्यांची जागा बदलली पण भेट चालूच राहिली....
एकेदिवशी ग्रामसभा भरली. जनावराच्या बाजाराला जागा आणि जनावरांना पाणी कमी पडत
असल्याने जागा बदलावी असा ठराव आला. आणि सरपंचानी पाण्याचा आणि जागेचा प्रश्न
मिटावा यासाठी नदीच्या काठावर बाजार भरवायचा असा ठराव मांडला. आणि सर्वानी होकार
दिला. आता नदीकाठावर  सफाई मोहीम हाती घ्यायचं ठरवण्यात आलं. दुस-याच दिवशी कामाला
सुरूवात झाली. नदी काठचा परीसर आणि झाडी बुलडोझर लाऊन साफ करण्यात येऊ लागली.
झाडं काढता काढता झाडाखाली अनेक पोती सापडली त्या पोत्यावर आडतीवर माल नेल्यावर
आडत्याच्या हमालांनी केलेल्या खुणा आढळल्या. त्यावर कांतुच्या बापाचे नाव लिहिलेले होते.
गावातल्या आगाऊ पोरांनी सगळी पोती कांतुच्या बापाला नेऊन दिली. आणि बापाला बारदाण्याचा
चोर समजला. गावातल्या लोकांत पांदीला सापडलेल्या पोत्याची चर्चा रंगू लागली. 
कांतू डबल चोर होता. अंजीचा 'चितचोर' आणि बापाचा 'बारदानाचोर.' चोरीचा मामला आणि
हळूहळू *** असा सगळा प्रकार
चर्चा चांगलीच रंगली भिंगरीत घडलेल्या टॉयलेट एक प्रेम कथेची