परभणी: प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात व्यापार्यांनी गुरुवार 8 एप्रिल रोजी येथील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
शहरातील व्यापारी गुरुवारी छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित आले. जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, कोरोनाचे सर्व नियम आम्ही पाळू तसेच सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरू मात्र, दुकाने उघडूच दिली नाही तर आम्ही दुकानाचे लाईटबील, कामगारांचे पगार कसे द्यावेत, यामध्ये प्रामुख्याने व्यापारीच भरडले जात असल्याचे नमूद करीत दुकानांना सूट द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापार्यांनी केली. यावेळी व्यापार्यांनी काही वेळ घोषणाबाजी करत परिसर दणाणुन सोडला.
नानलपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान गेली काही दिवस कोरोना व लाॕकडाऊनमुळे व्यापारी पुरते वैतागले आहेत. त्यामुळे आज त्यांच्या संतप्त प्रतिक्रीयाही पहायला मिळाल्या.