अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मिडीयावर आणखी एक दणका मिळालेला आहे. तरुणपिढीमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले स्नॅपचॅट या अॅपने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे.
“आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे”.असे स्नॅपचॅटने सांगितले आहे. त्यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण नागरिकांच्या भावना भडकावणाऱ्या असल्याचाही आरोप करत स्नॅपचॅटने ही कार्यवाही केली. हे आमच्या धोरणाविरोधात होते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.
याआधी युट्युब, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केल आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन करत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटले. शिवाय स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे.