अनैसर्गिक

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते.पाऊस ही खरंतर नैसर्गिक गोष्ट परंतु या गोष्टीला अनैसर्गिक म्हणून आपल्या चुकांवर पांघरुण घालणारे अनेक नेते आहेत.

अनैसर्गिक

महाराष्ट्रः दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईत ढगफुटी झाली आणि संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येकवर्षी मुंबईची तुंबई झालेली असते. हा पाऊस अशा स्परुपात कोसळतो की त्याला थांबवणं शक्य नसतं. कारण पाऊस ही खरंतर नैसर्गिक गोष्ट परंतु या गोष्टीला अनैसर्गिक म्हणून आपल्या चुकांवर पांघरुण घालणारे अनेक नेते आहेत. पावसासारख्या नैसर्गिक प्रक्रियेला सुद्धा अनैसर्गिक म्हणण्याचं कौशल्य आपल्या राजकारण्यांनी आत्मसात केलं आहे. खरंतर मुंबईची अशी स्थिती होण्यामागे अनेक कारणं आहेत. पावसाच्या पाण्याचा नीट निचरा न होणं, नाल्यांची सफाई न झाल्याने ते तुंबतात याच कारणांमुळे मुंबईची तुंबई होते.

अनेक वेळा हा विषय चर्चेत येतो, पावसाची चर्चा होते आणि प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची अशी अवस्था होते. २०१७ मध्ये अनिल परबांनी असं म्हटलं होतं की, मुंबईची तुंबई झाली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येते. आता परबांचं हे विधान लागू करण्याचं ठरवलं तर ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच द्यावी लागेल. परंतु आता ती जबाबदारी पावसावर दिली जाते आहे आणि त्याला अनैसर्गिक म्हटलं जातंय. कारण मुंबई मनपा आणि मुख्यमंत्री पद दोन्हीही सेनेच्याच ताब्यात आहे. मुळात अनैसर्गिक पाऊस कसा असतो हे कळण्यास अवघड आहे. परंतु हे अनैसर्गिक असणं युवराज आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं आहे. पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी पावसाला अनैसर्गिक म्हणून टाकलं. मुळात त्यांना हे दिव्य ज्ञान कुठुन आलं हे शोधण्याचा प्रयत्न केला तर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचं नाव समोर येतं. कारण ते ही पावसाला अनैसर्गिक म्हणतात.

अशा अनेक अनैसर्गिक गोष्टी महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत. एका ठराविक कालखंडानंतर प्रत्येक सजिवाचा मृत्यू होतो, हे नैसर्गिक आहे. परंतु "माणसं न मरताही त्यांना मारणं" ही अनैसर्गिक गोष्ट आहे. मुंबईच्या महापौर छातीत दुखू लागल्याने मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर मात्र एका मोठ्या माध्यमसमुहाला त्यांचे निधन झाले असल्याचा शोध लागला आणि तशी बातमी त्यांना छापून टाकली. हा मोठा माध्यम समूह म्हणजे इंडिया टुडे. त्याची हीच बातमी घेऊन किशोरी पेडणेकर यांनी एक ट्विट केलं आणि त्यात आपण जिवंत आहोत असं सांगितलं. त्यानंतर इंडिया टुडेने बातमीत थोडा बदल केला आणि हे चुकून झाल्याचं सांगून माफी मागितली. अशा अनेैसर्गिक गोष्टीही महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत.

आणखी एक मोठी अनैसर्गिक गोष्ट महाराष्ट्रात घडली. गांधी परिवार हे काँग्रेसचं स्थायी नेतृत्व आहे. म्हणजे जे जे गांधी आडनाव लावतील ते काँग्रेसचे नेते होत असतात. काँग्रेसचे लोक हिंदू धर्मग्रंथ मानतात की नाही ते ठाऊक नाही परंतु गांधी परिवाराने दिलेली आज्ञा ही त्यांच्यासाठी धर्माज्ञा असते. गांधींशिवाय काँग्रेसचे लोक इतर कोणताही विचार करु शकत नाहीत. 'गांधीयन' विचार ही काँग्रेसची नैसर्गिक कृती आहे. मात्र गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे असलेले नेते पृथ्विराज चव्हाण यांनी एक अनेैसर्गिक विधान करुन टाकलं. ते म्हणाले उद्धव ठाकरे प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यांना भारताचा पंतप्रधान करायला हवं. आता उपहासाने का असेना परंतु पृथ्विराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून एक अनैसर्गिक कृती करुन टाकली.

या कृतीचे त्यांच्यावर काय परिणाम होतील माहिती नाही, परंतु गांधी परिवाराचा त्यांच्यावर रोष नक्की येऊ शकतो. एकूणच महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या अनैसर्गिक कृतींची संख्या वाढली आहे. जेव्हा निसर्गाच्या विरोधात काही घडू लागतं तेव्हा काहीतरी विपरीत होणार याची जाणीव माणसाला होते. या सगळ्या अनैसर्गिक गोष्टींमध्ये उगाच डोळा फडफडू लागला आहे आणि काही विपरीत होणार नाही ना, याची चिंता वाढू लागली आहे.  

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.