यूपीत पुन्हा सामूहिक बलात्कार,  पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

1 min read

यूपीत पुन्हा सामूहिक बलात्कार, पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच पीडितेचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेश : बलरामपुर  जिल्ह्यातील गैसडी येथील एका गावात 22 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. हाथरस प्रकरण धगधगत असतानाच उत्तर प्रदेश पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरले आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच पीडितेचा मृत्यू झाला आहे.

बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीवर जवळच्या डॉक्टरांकडून उपचार करण्याचा प्रयत्न केला होता. घरची व्यक्ती आजारी असल्याचे सांगून आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना बोलावणे धाडले. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले असता, त्या खोलीत सदर पीडिता जखमी अवस्थेत आढळल्याने त्यांना संशय आला. घरातील एखाद्या जेष्ठ सदस्यास किंवा महिला सद्स्यास बोलवा, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आम्ही तिला दवाखान्यात घेऊन येऊ, असे सांगत आरोपींनी डॉक्टरांना जाण्यास सांगितले.

पीडित मुलगी 29 सप्टेंबरच्या सकाळी कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. या वेळी कारमधून आलेल्या 3-4 जणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. नराधमांनी अत्याचार करून तिच्या कंबरेची आणि पायाची हाडेदेखील मोडली. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी पीडिता जखमी अवस्थेत घरी पोहोचली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला.

सदर घटनेच्या दिवशीच सायंकाळी 7 च्या सुमारास मुलगी गंभीर स्थितीत रिक्षातून घरी पोहोचली. तिच्या हातावर कॅनुला लावलेला होता. ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि बोलूही शकत नव्हती. आरोपीने मुलीचे कंबरडे व पाय देखील तोडले, त्यामुळे ती उभीही राहू शकत नव्हती. नशेच्या इंजेक्शनची गुंगी आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे ती केवळ ‘मला वाचवा, मला मारायचे नाही. माझ्या पोटात खूप जळजळ होतेय’ इतकेच बोलू शकली. रुग्णालयात दाखल केल्यावर, पीडितेच्या शरीराच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागावार जखमा झाल्याने, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.