खासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नातून वीर मातेला मिळाली जमीन.

1 min read

खासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नातून वीर मातेला मिळाली जमीन.

राज्यशासनाने अटी शिथिल करून घेतला निर्णय.आज खा राजीव सातव यांनी रुक्मिणीबाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शासन आदेशाची प्रत देत त्यांचा सत्कार केला.

हिंगोली: मुलाला वीरमरण आल्यानंतर हलाखीचे जीवन जगणाऱ्या वीर मातेची कहानी प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणली. खासदार राजीव सातव यांनी पुढाकार घेत राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर, शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून अटी शिथिल करत वीर माता रुक्मिणीबाई भालेराव यांना चार एकर जमीन देण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असणाऱ्या पिंपळदरी येथील जवान कवीचंद परसराम भालेराव यांना 6 जुलै 2002 रोजी सीमा सुरक्षा दलात कर्तव्य बजावताना जम्मू-काश्मीर भागातील अनंतनाग येथे वीरमरण आले होते. जवानाच्या पश्चात त्यांची आई रुक्मिणीबाई भालेराव ह्या अतिशय हलाखीचे जीवन जगत होत्या. यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर रुक्मिणीबाई यांच्या मदतीसाठी ओघ सुरू झाला. अनेक राजकीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आर्थिक व धान्य स्वरूपामध्ये मदत केली.
परंतु भूमिहीन असणाऱ्या रुक्मिणीबाई यांना शासनाच्या वतीने कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता खा. राजीव सातव यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने कदम यांनी याची गांभीर्याने दखल घेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत श्रीमती भालेराव यांना उदरनिर्वाहाकरिता चार एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
WhatsApp-Image-2020-10-24-at-1.01.35-PM
सदर योजनेच्याअंतर्गत दारिद्र रेषेखालील असणारी अट क्रमांक 16 व 60 वर्षे वयाची अट क्रमांक 17 या दोन्ही अटी विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात आल्या. जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी रुक्मिणीबाई भालेराव यांना सदर योजनेअंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश राज्याचे सहसचिव दिनेश इंगळे यांनी दिले आहेत. वीर मातेला यामुळे कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान आज खा राजीव सातव यांनी रुक्मिणीबाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शासन आदेशाची प्रत देत त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे अनिल वाणी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.