विजय कुलकर्णी/परभणी : एकत्र बसून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडत गावांचा विकास साधा असे आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले होते. त्यास प्रतिसाद लाभला असून सेलू आणि जिंतूर तालुक्यातील एकुण २५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. या सर्व गावांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार असून गावांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्याचे आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले होते. अशा ग्रामपंचायतींना २१ लाख रुपये निधीचे विशेष पारितोषीक देण्याची घोषणाही बोर्डीकर यांनी केली होती.
आ. बोर्डीकर यांच्या या आवाहनास जिंतूर विधानसभा मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिंतूर तालुक्यातील १३ तर सेलू तालुक्यातील १२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. यातील बहुतांश गावांमध्ये बोर्डीकर गटाचा वरचष्मा राहीला आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.
जिंतूर तालुक्यातील बिनविरोध झालेले गाव
भोगाव, कवडगाव, रिडज मानधनी, जुनूनवाडी, बेलखेडा, जांभरून,अंगलगाव तांडा, शेक, वाघी बोबडे, पिंपळगाव काजळे, येसेगाव, बोरगळवाडी
सेलू तालुक्यातील बिनविरोध झालेले गाव
निपाणी टाकळी, करंजखेडा, खैरी, नीरवाडी खुर्द, गोहेगाव, वाई, लाडनंद्रा, केमापुर, खूपसा, कन्हेरवाडी, पिंप्रुळा, तळतुंबा.

बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा आ. मेघना बोर्डीकर यांनी विशेष सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गावपुढाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या असून आता या सर्व गावांना विशेष निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपली आहे. यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगीतले.