मराठवाडा मुक्ती संग्रामतला उपेक्षित योद्धा : स्वामी रामानंद तीर्थ

1 min read

मराठवाडा मुक्ती संग्रामतला उपेक्षित योद्धा : स्वामी रामानंद तीर्थ

एकीकडे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला म्हणून आनंदाला भरते आलेले होते. सनई चौघडे वाजत होते. भारतीयांनी मोकळा श्वास घेतला असला तरी दुसरीकडे महाराष्ट्रातला सध्याचा मराठवाडा विभाग, कर्नाटकातला काही भाग व संपूर्ण हैद्राबाद संस्थानला अजूनही स्वातंत्र्य मिळाले नव्हते.

एकीकडे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला म्हणून आनंदाला भरते आलेले होते. सनई चौघडे वाजत होते. भारतीयांनी मोकळा श्वास घेतला असला तरी दुसरीकडे महाराष्ट्रातला सध्याचा मराठवाडा विभाग, कर्नाटकातला काही भाग व संपूर्ण हैद्राबाद संस्थानला अजूनही स्वातंत्र्य मिळाले नव्हते. कारण हैद्राबाद संस्थानचा निजाम शरण यायला तयार नव्हता. शेवटचा निजाम उस्मान अली खान हा त्यावेळी संस्थानचा अधिपती. त्याचा मुजोर सेनापती कासीम रिझवी हा खुपच मस्तवाल व क्रूर होता...

अशा परिस्थितीत सरदार पटेलांनी हैद्राबादच्या निजामाला अनेकदा बिनशर्त भारतात विलीन होण्याची सूचना केली. मात्र निजाम तयार होत नव्हता. मग समाजमन पेटले आणि निजाम व त्याचा सेनापती कासीम रिजवीचे सैन्य व स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या सच्चा भारतीयांमध्ये एक संघर्ष सुरू झाला. या संघर्षाची बीजे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली रोवली गेली. स्वामीजींचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. त्यांनी संन्यास घेतला आणि स्वामी रामानंद तीर्थ असे नव्हे नाव धारण केले.

स्वामीजी मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी. पी. व्ही. नरसिंहराव, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह मराठवाडा, कर्नाटक व तत्कालीन आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील अगणित देशभक्त लढले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष निजामशाहीशी संघर्ष करावा लागला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम व रझाकाराने पाकला पलायन केले आणि हैद्राबाद संस्थानातील रयतेने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. या घटनेला आज ७२ वर्ष झाली. मात्र, मुक्ती संग्रामात आपले योगदान दिलेल्या नायकांचा योग्य सन्मान झाला नाही, याचे शल्य आहे. मुक्ती दिनी ध्वजारोहण व स्वातंत्र्य सैनिकांना 'एक गुलाबपुष्प' या पलीकडे फार काही मिळाले नाही व मिळत नाही, ही खेदाची बाब आहे.

अब्दुल रहेमान अंतुले मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात हुतात्मा स्मारकं, हुतात्मा स्तंभ उभारली गेली. पण सरकारी अनास्थेमुळे देखभालीअभावी स्मारकाची अवस्था वाईट आहे. गल्लीबोळात एऱ्यागैऱ्याची स्मारकं, पुतळे उभी राहिली. पण स्वामीजींचे चिरंतन स्मारक मराठवाड्यात कुठेही उभे राहिले नाही. इकडे महाराष्ट्रात विलासरावांनी 'हैद्राबाद मुक्ती संग्राम' नाव बदलून 'मराठवाडा मुक्ती संग्राम' झाले तर तिकडे येडीयुराप्पा यांनी 'कल्याण कर्नाटक मुक्ती संग्राम' असे नामकरण केले. यापलीकडे काही घडले नाही.

स्वामीजींची जन्मभूमी कर्नाटकातील सिंदगी (जि. विजापूर) असली तरी त्यांची कर्मभूमी मराठवाडा राहिली. औसा तालुक्यातील हिप्परगा इथं त्यांनी दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा बजावली. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातला स्वामीजी व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान लक्षात घेता एक यथोचित स्मारक मराठवाड्यात, औरंगाबाद, नांदेड किंवा लातूर-उस्मानाबाद जिल्हयात उभे करावे असे राज्यकर्त्यांना वाटले नाही, यासारखे दुर्दैव नाही. मराठवाडा विभागात स्वामीजींचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाची उभारणी व्हायला हवी. स्वामीजींच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवन कार्याची उजळणी व्हावी. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मुक्ती संग्रामाचा लढा अंतर्भूत व्हावा. नवीन पिढीला मुक्ती संग्रामाची ओळख, स्वातंत्र्याची जण आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची माहिती मिळण्याची गरज आहे ..