विजय कुलकर्णी / परभणी : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२०-२१ साठी ठरवून देण्यात आलेले नळजोडणीचे उद्दिष्ट ऑनलाईन करण्यामध्ये परभणी जिल्ह्याने १०० टक्के पूर्ण करून मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळाद्वारे पुरविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे.
सन २०२०-२१ या वर्षांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत शासनामार्फत परभणी जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी नळजोडणीचे ६८,६०४ एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट परभणी जिल्ह्याने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी स्वच्छ भारत मिशन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि सर्व तालुक्यातील संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे."हर घर नल से जल" या योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची मोहीम केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शासकीय योजनेद्वारे व खाजगी बोरवेलद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट आहे. यामध्ये १५ व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीतून नळ जोडणीची आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत.

वैयक्तिक नळ जोडणीच्या या मोहिमेमध्ये स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. पवार, उप अभियंता गंगाधर यंबडवार, उप अभियंता माथेकर, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व तालुक्यांचे गट समन्वयक , समूह समन्वयक, जिल्हा कक्षातील सल्लागार यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.