औरंगाबाद : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर, राजकीय मतभेद असले तरी; आमच्यात वैमनस्य नसल्याचं सांगत दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली आहे. संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्र्वभुमीवर दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. चर्चेचे नेमकं कारण न समजल्याने राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा होत्या. राज्यात वेगळी राजकीय समीकरणं आखली जात आहेत का? अशीही विचारणा होत आहे. रावसाहेब दानवे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण देत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं सांगितलं.
फडणवीस-राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय, “काही दिवसांपूर्वी मी संजय राऊत यांना भेटलो. त्यांनी चहाचं निमंत्रण दिल्याने त्यांच्याकडे गेलो. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातही अशीच भेट झाली. दोन पक्षांचे नेते भेटत असतात, चर्चा करत असतात. त्यामुळे अशा भेटींमधून राजकीय अर्थ काढण्यासारखं काहीही नसतं.” तसेच भाजपाची भूमिका स्पष्ट करताना, महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.