सुमित दंडुके / औरंगाबाद : सामना वृत्तपत्रातून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून झालेल्या विरोधाला उत्तर देण्यासाठी सडेतोड अग्रलेख लिहिण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे . त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते . तर आता या मुद्द्यावरून मनसेनेही शिवसेनेची कोंडी केली आहे .
अग्रलेख काय लिहित बसलाय , नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरून संदीप देशपांडे म्हणाले की, आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावे. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचे नामांतर करायचं तर लवकर करा. तसेच २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल , असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले आहे.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत त्यांना कृती करणे जमत नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.