20 नोव्हेंबर 2019 रोजी नेमकं काय घडलं?

जोशींची तासिका त्या दिवशी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या चर्चा जोरात सुरू होत्या. प्रसारमाध्यमातून "सूत्रांची माहिती" हे मुख्यमंत्री होणार, ते होणार, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार यांना हे खाते त्यांना ते असा हलकल्लोळ माजला होता.

20 नोव्हेंबर 2019 रोजी नेमकं काय घडलं?

जोशींची तासिका

त्या दिवशी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या चर्चा जोरात सुरू होत्या. प्रसारमाध्यमातून "सूत्रांची माहिती" हे मुख्यमंत्री होणार, ते होणार, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार यांना हे खाते त्यांना ते असा हलकल्लोळ माजला होता. आणि अचानक एक बातमी दिल्लीवरून फ्लॅश झाली "शेतकरी प्रश्नावर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले."

इकडे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर कोणाची उत्सुकता ताणली गेली. "खरंच त्या दिवशी नेमकं काय घडलं?"

तर मंडळी त्या बैठकीत नमस्कार चमत्कार, चहापाणी ही औपचारिकता झाल्यावर राजकीय शेतीतील पेरणीची बोलणी सुरू होणे स्वाभाविक होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवायचे ठरले. पण, त्याचे दूरगामी परिणाम "भोगण" ही दोन्ही बाजूंना परवडणारी गोष्ट नाही यावर एकमत झालं. शेवटी लिटमस टेस्ट करण्याच धाडस म्हणून २३ नोव्हेंबर रोजी २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बोहल्यावर चढवण्यासाठी "पहाटे ८" चा मुहूर्त ठरला.

परंतु, याचं बुमरँगग होऊन दोन्ही पक्षाचे "कट्टर भक्त" नाराज होऊन आगडोंब उलटेल याचा अंदाज दोन्ही बाजूंना होता. कारण स्वाभाविक आहे निवडणुकीपूर्वी पाच वर्षे एकमेकांविरुद्ध खिंड लढवलेले प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा डिजिटल योद्धे गप्प बसणार नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही गाजराची पुंगी मोडून काडीमोड घ्यायचा असे ठरविण्यात आले.

पण, राजकारणात एक कृती ही कायमस्वरूपी दुखणे ठरू शकते. या एका कृतीने कायमस्वरूपी "बट्टा" दोहोंना लागणार हे निश्चितच होते. त्यावर "सोन्याचा दागिना बनवताना बट्टा आवश्यक असतो" असं कोणीतरी बोललं आणि सगळे निश्चिन्त झाले.

अशा परिस्थितीत धुरीण मंडळीनी प्लॅन B डेव्हलप केला. त्यात राष्ट्रवादीने सेना व काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवावे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेचं यांना "करून दाखवावे". पुढे सरकार स्थापनेनंतर कारभार सुरू करावा. याने दोन्ही पक्षांना काय फायदा तर?. सेनेचा मुख्यमंत्री असल्याने हळूहळू येनकेनप्रकारेण सेना कशी अडचणीत येईल याबाबत रणनीती ठरवली गेली.

भाजप आजवर ज्याचं बोट धरून वर येतो त्यांनाच शिरजोर होतो. जनता दल युनायटेड, शिरोमणी अकाली दल, आसाम गणपरिषद, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असे अनेक उदाहरण आहेत. पण, महाराष्ट्रात शिवसेनेच्या वोट बँकेला खिंडार पाडणे काही केल्या भाजपला शक्य झाले नाही. बाळासाहेब हयात असताना नाही आणि बाळासाहेबांच्यानंतर २०१४ साली सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चांगल्या प्रकारे आमदार "निवडून आणून दाखवले".

सेनेचा मुख्य मतदार हा मराठा व ओबीसी वर्ग आहे असे मानले जाते. त्यामुळे सत्तेत असताना सेना आपल्याच लोकांच्या नजरेत उतरवायची याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे ठरले. आणि सेनेचे मतदार विभागून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्यापरीने आकर्षित करायचे याबद्दल खल झाला.

चर्चेच्या शेवटी "पुन्हा २३ नोव्हेंबर" करायचा असेल तर तेव्हा "योग्यवेळी" राष्ट्रपती राजवट लागू करून "शेतकरी कल्याणार्थ सरकारी तिजोरीवर ताण नको म्हणून राज्याचा भल्यासाठी एकत्र येण्याची घोषणा करू असे ठरले."

त्यावेळी माझ्या काळजाचे ठोके चुकले, धस्स झाल्याने डोळे उघडून घड्याळाचे काटे निरखून पाहिले "पहाटेचे चार वाजले होते". त्या दिवशी मी स्वप्नात होतो हे लक्षात आल्याने सुटकेचा निःश्वास टाकला आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करून दिवसाला सुरुवात केली.
-अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.