अल कायद्याच्या दहशतवादी महिलेला बंगरूळमध्ये अटक; पाकिस्तान कनेक्शन समोर

भारतीय लष्कराचे ऑपरेशन महादेव नुकतच पार पडलं. यात पहलगाम हल्ल्यात सामील असणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं. त्यानंतर आता गुजरात एटीएसने दहशतवादविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसनं बंगरूळमधून शमा परवीन या ३० वर्षीय तरूणीला अटक केली आहे. ही महिला अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनंट म्हणजेच AQIS या संघटनेची दहशतवादी आहे. एटीएसनं आता तिला अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.

२३ जुलै रोजी एटीएसने देशाच्या वेगवेगळ्या भागातून अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली. यानंतर, एटीएसने त्यांची चौकशी केली तेव्हा शमा परवीनचं नाव समोर आलं. तेव्हापासून एटीएस शमाच्या सोशल मिडीया अकाउंटवर नजर ठेऊन होते. शमा परवीन ही मुळची झारखंडची असून ती सध्या कर्नाटकच्या बंगरूळमध्ये राहत होती. ती बेरोजगार आणि अविवाहीत आहे. शमा सोशल मिडियावरून कट्टरपंथी भाषणं, भडकाऊ पोसंट, व्हिडिओ शेअर करत होती. देशाविरोधात भडकाऊ पोस्ट करत होती. एवढच नाही तर शमा थेट पाकिस्तानशी संपर्कात होती याचे डिजिटल पुरावेही सापडले आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी या कारवाईबद्दल एटीएसचं अभिनंदन केलं असून हे एटीएसला मिळालेलं मोठं यश असल्याचं म्हटलं आहे.

अल-कायदा मॉड्यूलची महिला दहशतवादी शमा परवीन

शमा परवीन ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूलवर काम करत होती. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जिहादी विचार पसरवण्यासाठी 5 इन्स्टाग्राम खाती शमा परवीन चालवत होती. त्यात ती तरुणांना जिहादी विचारासाठी प्रवृत्त करत होती. फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करत होती. या खात्यांवरून अल-कायदाच्या नेत्यांचे व्हिडिओ आणि भडकाऊ भाषणे शेअर केले जात होते. शमा परवीनचं पाकिस्तान कनेक्शनही समोर आलं आहे. ती AQIS चा प्रमुख मौलाना असीम उमर ऊर्फ सनाउल हक याच्या प्रभावाखाली होती. मौलाना असीम उमरची भडकाऊ विधाने ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करून लोकांचं ब्रेनवॉश करत होती. शमा परवीन ही अल कायद्याच्या दहशतवादी मोड्यूलची मास्टरसाईंड असल्याची माहिती समोर आली आहे.

शमाला कशी अटक झाली?

एटीएस अधिकारी हर्ष उपाध्याय यांना अल-कायदाच्या भारतीय मॉड्यूलची पहिली कल्पना आली. त्यानंतर एसपी के सिद्धार्थ यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. एटीएसच्या चार टीम दिल्ली, नोएडा, मोडासा आणि अहमदाबाद येथे पाठवण्यात आल्या. तिथून २१ आणि २२ जुलै रोजी चारही आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेले हे दहशतवादी इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ‘गजवा-ए-हिंद’ विचारसरणीच्या नावाखाली भारतात हिंसाचार पसरवण्याचा कट रचत होते. शमा यातील तीघांना सोशल मिडियावर फॉलो करत होती. त्यांच्या चौकशीतून आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासणीतून शमा परवीनचं नाव समोर आलं. त्यानंतर गुजरात एटीएसची टीम बेंगळुरूला पोहोचली. 29 जुलै रोजी स्थानिक पोलीस आणि केंद्रीय एजन्सींच्या मदतीने शमा परवीनला अटक केली.

प्राथमिक तपासणीत तिच्या मोबाईल फोनमधून अनेक व्हिडिओ आणि पोस्ट सापडल्या आहेत. ज्यात जिहादी भाषणे, भारतविरोधी विधाने आणि तरुणांना हिंसेसाठी भडकावण्याच्या प्रयत्नांचे पुरावे आहेत.

या शमा परवीनला अटक झाली असून तिच्या विरोधात यूएपीए आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून तिच्या सोशल मीडिया खाती, ईमेल आणि परदेशी संपर्कांचीही सखोल चौकशी केली जात आहे.

Share