‘ऑपरेशन महादेव’ ला यश; पहलगामध्ये 26 पर्यटकांना मारणारे आतंकवादी ठार

सध्या संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आज चर्चा सुरू आहे. त्याच वेळी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमान शाह याचा खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत दहशतवादी अबू हमजा आणि यासिर हे देखील मारले गेले आहेत. सुरक्षा दलांना हे दहशतवादी बऱ्याच काळापासून हवे होते. सरकारने सुलेमान शाहवर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले. तिन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरून एक अमेरिकन बनावटीची कार्बाइन, एक AK-47 रायफल, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान, यासिर आणि अली यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमान आणि यासिर यांचा सहभाग होता. या भागात चौथ्या दहशतवाद्याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.

श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी 12:30 वाजता दिली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “ऑपरेशन महादेव – ‘जनरल एरिया लिडवास’ मध्ये संपर्क स्थापित झाला आहे.” दुपारी 1:30 वाजता लष्कराने सांगितले की तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात कारवाई सुरू केली होती. लष्कराच्या कारवाईदरम्यान संसदेत ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत, आमचे सरकार, आमचे सैन्य आणि आमच्या लोकशाही संस्था, सर्व मिळून देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यास वचनबद्ध आहेत’ असं सांगितलं आहे.

Share