जगदीप धनखड यांचा राजीनामा; नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होते?

जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण सांगत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे’, असं म्हटलं आहे.  राष्ट्रपती मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती होते. आता पुढचे उपराष्ट्रपती कोण होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचा सगळा कारभार हे उपसभापती पाहतात.

जगदीप धनखड यांनी व्यंकय्या नायडू यांच्यानंतर 11 ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. पण कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. पण धनखड यांच्यानंतरच्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होईल जाणुन घेऊया.

नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो.

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. हे मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं.

लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात.

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा.

भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत नव्या उपराष्ट्रपतीची निवड आवश्यक असते. त्यामुळे निवडणूक आयोगाला 19 सप्टेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. इंडिया आघाडी उमेदवार देणार का? आणि पुढचे उपराष्ट्रपती कोण असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share