बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना नुकताच पार पडला. यात नागपूरच्या दिव्या देशमुखनं महिला बुद्धीबळाचा अंतिम सामना जिंकत विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने गेल्या 23 जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
नागपूरची 19 वर्षांची दिव्या देशमुख आता केवळ वर्ल्ड कप विजेतीच नाही, तर तिने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे. दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.
विजयानंतर दिव्या देशमुखनं मला आता बोलणं कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरूवात आहे. अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महिला वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या दिव्या देशमुखला विजेतेपदाबरोबरच सुमारे 42 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. उपविजेती कोनेरू हम्पी हिला 35,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपये मिळाले.
या महिला बुद्धीबळ विश्वचषकात भारतानं अजून एक इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी या दोन भारतीयांमध्येच लढत झाली. त्यामुळे दोघींपैकी कोणीही जिंकलं तरी विश्वचषक भारतातच येणार हे निश्चित होतं. त्यामुळे भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. आता दिव्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.