उत्तर प्रदेशः निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आत्तापर्यंत भाजपच्या ३ मंत्री आणि ११ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा देणारे ३ मंत्री आज अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत. तर त्यांच्याबरोबर सहा आमदार देखील समाजवादी पार्टीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता अधिकच वाढली आहे.
काही दिवसांन पासून उत्तर प्रदेशमध्ये राजीनामासत्र सुरू होते. राजीनामा दिल्यानंतर हे मंत्री आणि आमदार कोणत्या पक्षात जाणार याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अखेर यातील तीन मंत्री आणि सहा आमदार सायकलवर स्वार होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत आज १२.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये तीन मंत्री आणि सहा आमदार समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत.
ज्या तीन मंत्र्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धर्म सिंह सैनी या तिघांचा समावेश आहे. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर ब्रजेश प्रजापती, रोशन लाल वर्मा, भगवती सिंह सागर, मुकेश वर्मा, विनय शाक्य आणि बाला अवस्थी यांनी राजीनामे दिले होते. आणखी काही आमदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचा दावा या राजीनामा दिलेल्या आमदारांनी केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे भाजपला हरवण्याचा दावा करत आहेत. ११ आमदारां पैकी यातील ९ जण समाजवादी पार्टीत दाखल होणार असल्याने अखिलेश यादव यांची ताकद वाढणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या तोंडावरच भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.