काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयानं २०१५ मध्ये बंद केली होती.

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं समन्स पाठवल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. सोनिया आणि राहुल गांधी या नोटिशीमुळे घाबरणार नाहीत, झुकणार नाहीत आणि छातीठोकपणे लढतील, असं सुरजेवाला म्हणाले.

 

तसेच ईडीनं सोनिया आणि राहुल गांधींना ८ जूनला चौकशीसाठी बोलावलं आहे. सोनिया चौकशीला उपस्थित राहतील. राहुल सध्या परदेशात आहेत. ८ तारखेपर्यंत राहुल मायदेशी परतल्यास तेदेखील ईडीच्या कार्यालयात जातील. अन्यथा ईडीकडून अधिकचा वेळ मागण्यात येईल, अशी माहिती सिंघवी यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.

Share