मुंबई : वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणीगोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृहात बैठक झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल,ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी नळगंगा खोऱ्यात नेण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावर अमरावती आणि नागपूर विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माझ्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत गोदावरी नदीच्या खोऱ्यातील पाणी सिंचनाकरिता वळवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत तसेच वैनगंगा नळगंगा नदी प्रकल्पासंदर्भातील आराखडा तयार करण्याबाबत सुचना दिल्या.#MaharashtraFirst pic.twitter.com/LYnOKEnxJk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 7, 2022
राज्यातील १०४ प्रकल्प दहा ते वीस टक्के प्रकल्प अपूर्ण आहेत. हे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे सांगितले. तसेच जलसंपदा विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
गोदावरी नदीच्या खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी प्रकल्पही अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले जावे. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.