मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. अशात आता आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवेसनेते प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे, अरविंद सावतं, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते.
यावेळी ईडी , सीबीआय , निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही. तेव्हा मी ठरवलं की शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही. आणि मला अजून पीठ मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाहीत. मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. अनेक जण म्हणाले की, मी टीका केली होती. पण आमचं एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुषमाताई अंधारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/lnl9SL924R
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) July 28, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आता काही लोक नसलेल्या शिवसेनेची पद वाटत आहेत. त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. मी आपल्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचं पद वाटत आहे. अनेकांना मी पद आणी जबाबदाऱ्या देत असतो. आता दोन लढाया सुरु आहेत. एक म्हणजे कायद्याची आणि दुसरी जनतेची. ही लढाई, हा निकाल काही फक्त शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नाही. तर देशात लोकशाही जिवंत आहे का ते कळेल. जे लोक इकडे वाढले, मोठे झाले, ते आता तिकडे गेले. शिवसेना आणि बाळासाहेबांनी सामान्यातून असामान्य लोक तयार केली. ते आता तिकडे केले. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळी आलीय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. मी आज सुषमाताईंना एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
कोण आहेत सुषाम अंधारे?
१) कोरेगाव भीमा प्रकरणात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत फिर्याददार
२) शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या
३) गणराज्य संघाच्या प्रमुख. या संघामार्फत संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचं काम
४) लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गणराज्य संघचा राष्ट्रवादीला पाठींबा दिला.
५) विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेवर संधी मिळण्याची आशा मात्र पक्षाकडून अमोल मिटकरी यांना पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी
६) राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी संधी मिळण्याची आशा मात्र त्यावेळी देखील संधी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर
७) मागील काही दिवसांपासून सचीन अहिर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत चर्चा