मला बाळासाहेबांचा वारसा पुढे न्यायचाय – राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा एकदा धडाडली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.

राज ठाकरे म्हणाले की, आज महापुरुषांचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जात आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तर वासरा हा विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे यावरून काही होत नसतं. विचारांचा वारसा पुढे चालवावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला त्या विचारांची पताका पेशव्यांनी अटक किल्ल्यापर्यंत फडकवली. महाराजांचा विचार पोहोचवला कुणी तर पेशव्यांनी. पेशव्यांच्या हातात संपूर्ण सत्ता होती. मात्र त्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणवून घेतले नाही. छत्रपती तेच आम्ही त्यांचे नोकर, असे पेशवे सांगत. माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, जी गोष्ट आहे ती पुढे नेण्याची गरज आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय आणि नसलं काय. याने काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार बाकीचं सोडा त्याबाबतीत मी श्रीमंत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी, महापुरुषांनी जे विचार पेरलेत ते वाचणं, ऐकणं, बोध घेणं, महाराष्ट्र समजून घेणं, या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत. तर या गोष्टी टिकतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Share