मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नव्हता. त्यामुळे लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. याविरोधात लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अॅड.विश्वजित सावंत तर, मुंबई पालिकेतर्फे अॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.
महानगरपालिकेला आपल्या सेवेचा राजीनामा त्वरीत मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. आता मात्र या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पालिकेला खडसावले. पालिकेकडे विशेषाधिकार आहेत, असे असतानाही अशी प्रकरणं न्यायालयात येता कामा नये, असे पालिकेला बजावले. तसेच, “उद्या (शनिवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करा,” असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला.