राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी 13 जुलै रोजी राज्यसभेवर 4 खासदारांची नियुक्तीची घोषणा केली. प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबतच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ञ डॉ. मिनाक्षी जैन आणि केरळमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी सदानंद मास्टर यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राज्यसभेवर नामांकन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचं अभिनंदन करत त्यांच्या कामाचंही कौतुक केलं आहे.
राष्ट्रपती नामनिर्देशित म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झालेल्या या चार खासदार सदस्यांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया…
उज्ज्वल निकम
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. उज्ज्वल निकम यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण, काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता राज्यसभेच्या रुपाने त्यांच्यासाठी खासदारकीचं दार उघडं झालं आहे. उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं असून त्यांनी देश आणि राज्य पातळीवर अनेक महत्वाचे खटले लढवले आहेत.
सी. सदानंदन मास्टर
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील हायस्कूल शिक्षक, सी. सदानंदन मास्टर हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं आहे. याशिवाय, ते केरळमधील राष्ट्रीय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत.
डॉ. मिनाक्षी जैन
डॉ. मिनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार आहेत. डिसेंबर 2014 मध्ये, त्यांना भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले. साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी 2020 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हर्षवर्धन श्रृंगला
हर्षवर्धन श्रृंगला हे भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत. आयएफएसमधून निवृत्ती घेतल्यानंतर, 2023 मध्ये त्यांना भारताच्या जी20 अध्यक्षपदासाठी मुख्य समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले.