मुंबईः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांत भाजपने जवळपास स्पष्ट बहुमत मिळवल्याचे दिसत आहे. या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
शरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये वेगळे चित्र बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये जे चित्र आहे ते भाजपला अनुकूल असून काँग्रेसला झटका देणारे आहे. अरविंद केंजरीवाल यांचे दिल्लीतील जे सरकार आहे त्याबाबत दिल्लीतील सामान्य नागरिकांची मते ही केंजरीवाल यांच्या पक्षाच्या बाजुने असतात. पंजाब या सीमेवरील राज्यात दिल्लीच्या कामाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे .दिल्लीतील सुविधांमुळे पंजाबमधील नागरिकांनी आम आदमी पक्षाला कौल दिला आणि ‘आप’ला स्वीकारले आहे. पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी जे पक्ष सध्या सत्तेत आहेत त्यांनाच पुन्हा समर्थन देण्याची भूमिका त्या त्या राज्यातील जनतेने घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचे राज्य प्रस्थापित झाले आहे.
दिल्लीत कृषी विधेयकांच्या विरोधात एक मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात सर्वात मोठा सहभाग पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा होता. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता तो या निवडणुकीत दिसून आला. पंजाबमध्ये नागिरकांनी भाजप आणि काँग्रेसला पराभूत करत नव्या पक्षाला संधी दिली असेही शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की, काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महत्वाचे म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले. तसेच अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झाले त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत ‘आप’ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं पवार म्हणाले. युपीत अखिलेशची चूक अजिबात वाटत नाही, ते एकटा लढलेत तिथे, जी मत त्याला पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामे सुरू करावी लागतील असे पवार म्हणाले.
‘महाराष्ट्र बाकी है तो महाराष्ट्र तैयार है’ असे म्हणत शरद पवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, उत्तरप्रदेश तो बाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है.