मुंबई : पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करुन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती, पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पार्टीने जनतेला महागाईची भेट दिली आहे. अशी टिका काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भाजप सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलाचे दर वाढत आहेत. आज एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये, तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. आधीच पेट्रोल, डिझेल प्रति लिटरच्या दर १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गॅस सिंलिडर १ हजाराच्या जवळ पोहचला आहे. रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या किंमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादन, माॅल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ डिझेल रुपये प्रति लिटरने महाग केले आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सामान्य माणसांनाच बसणार आहे. महागाई मागील सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे.
तसेच एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत असून, सामान्य जनतेवर हा दुहेरी मार आहे. निवडणुकीच्या प्रचारात एलपीजी गॅस मोफत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. पण निवडणूका होताच मोफत होताच मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंमत वाढवली आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होताच पट्रोल, डिझेलचे दर कमी केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होताच महागाईची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प बसतात आणि हिजाब, हिंदू- मुस्लीम, पाकिस्तान, जीना, या प्रश्नावर आकांडतांडव करून जनतेचे लक्ष्य मुख्य मुद्द्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी टीका केली आहे.