मुंबई : राज्यात ईडीने मोठी कारवाई करत राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या नीलांबरी प्रोजेक्ट्समधील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. जवळपास साडे सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
कोण आहेत श्रीधर पाटणकर?
श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे उद्योजक असून ते डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर यांचे वडिल माधव पाटणकर हे देखिल मोठे उद्योजक होते. श्रीधर पाटणकरांच्या ठाणे इथल्या निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्कप बुलियन कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं.
नेमक प्रकरण काय आहे?
२०१७ मध्ये २० ते ३० कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे.