मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. मुंडे यांना तातडीने रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेते मंडळींनी धाव घेतली आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर प्रकृतीविषयक माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ‘धनंजय मुंडे यांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. एमआरआय सह इतर तपासण्या करण्यात येत आहेत. मुंडे हे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पक्ष कार्यालयात होते. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कुटुंब त्यांच्यासोबत असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,’ असंही अजित पवार म्हणाले आहे.