आलिया रणबीर पाठोपाठ आता टॉलिवूड इंडस्ट्रीत लवकरच सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहेत. अभिनेत्री नयनतारा तिचा प्रियकर दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न करणार आहे. नयनतारा आणि विघ्नेश गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘राउडी धान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती आणि येथेच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘एके 62’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी हे कपल लग्न करू शकतात. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. विघ्नेश ‘एके 62’चे दिग्दर्शन करत आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू होईल, त्यापूर्वी दोघेही लग्नाच्या बंधनात अडकतील. नयनताराकडून अजून या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
नयनतारा आणि विघ्नेश या दोघांचा २५ मार्च २०२१ मध्ये साखरपुडा झाला होता, या दोघांची प्रेमकहाणी फिल्मी आहे. त्यांचा लग्नसोहळा खासगी असेल की शाही याबाबत माहिती समोर आलेली नाही. चेन्नईतील प्रसिद्ध कालिगंबल मंदिराबाहेर हे दोघे स्पॉट झाले होते. दोघेही लग्नापूर्वी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले होते.
लवकरच विघ्नेशचा ‘कथुवाकुला रेंडुकधल’ हा चित्रपट २८ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विजय सेतुपती, नयनतारा आणि सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. विघ्नेशच्या दिग्दर्शनाखाली नयनताराचा हा दुसरा चित्रपट आहे.