मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं. या पदावर आता विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी या निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षांसह विभागनिहाय अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
फौजिया खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. @DrFauziaKhanNCP यांनी आज विद्याताईंना नियुक्ती पत्र दिले. #NCP #महिलाप्रदेशाध्यक्ष #नियुक्ती pic.twitter.com/nzSLvYdWjo
— NCP (@NCPspeaks) May 5, 2022
प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर विद्या चव्हाण म्हणाल्या की, महागाईसारख्या प्रश्नाकडे सध्या दुर्लक्ष झालं आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.